ओटीपी न देताही फसवणूक; कामगाराला ३५ हजारांना गंडा

तक्रारदाराकडून बँकेने न्याय देण्याची मागणी

बँकेशी संलग्न मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर न करताही एका कंपनी कामगाराला भामट्यांनी तब्बल ३५ हजारांना ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी शहरात घडला. या प्रकारामुळे बँकांसह ग्राहकांनादेखील आता केवळ ओटीपीच नव्हे तर मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करावा लागेल.

सिडकोच्या उपेंद्रनगरात राहणार्‍या चंद्रभान राक्षे हे अंबड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामगार आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी 8260163158 या क्रमांकावरुन फोन आला होता. समोरील व्यक्तीने त्यांना आपण गूगल पे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांना 9861451213 या क्रमांकावरुन एसएमएस आला. त्यात https://www.surveymonkey.com/r/S5KDV82 ही लिंक देण्यात आलेली होती. फोनवरील हिंदी भाषिक व्यक्तीने राक्षे यांना त्यांच्या तक्रारीसाठी लिंकवर क्लिक करुन अर्ज भरण्यास सांगितले. आर्थिक व्यवहारासंबंधित तक्रार आधीच प्रलंबित असल्याने, आलेल्या फोनवर विश्वास ठेवत राक्षे यांनी एसएमएम मधील लिंकवर क्लिक केले आणि त्यापुढे स्वतःच्या नावासह बँकेचे डिटेल्सदेखील टाकले. शेवटच्या टप्प्यात त्या लिंकद्वारे ओपन झालेल्या वेबसाईटवर ओटीपी विचारण्यात आला. मात्र, रात्रे यांना फसवणुकीबाबत माहित असल्याने त्यांनी ओटीपी दिला नाही. मात्र, याचवेळी त्यांना २५ हजार रुपये बँकेतून गेल्याचा मेसेज आला. ओटीपी शेअर न करताही एवढी मोठी रक्कम गेल्याचे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने फोन बंद केला.

काही वेळात त्यांना पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन आला आणि त्याने तुमच्या अकाऊंटमधील पैसे चुकून आपल्या अकाऊंटला आल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर मात्र राक्षे यांचा जीव भांड्यात पडला. समोरील भामट्याने राक्षे यांना पुन्हा त्याच लिंकद्वारे सर्व माहिती भरण्यास सांगितले. ही माहिती भरल्यानंतर पैसे परत मिळतील, या अपेक्षेने राक्षे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या बँकेतून पुन्हा १० हजार रुपये अन्य बँक खात्यावर वर्ग झाल्याचा मेसेज त्यांना आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राक्षे यांनी तातडीने आपल्या बँकेत धाव घेतली. त्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले. मात्र, त्याचे कोणतेही लेखी त्यांना दिले नाही. पोलिस स्टेशनमध्येही राक्षे यांनी तक्रार केली. त्यानंतर सायबर पोलिसांत गेले. त्या ठिकाणी मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळाले. एका कर्मचार्‍याने दोन बँकांमधून माहिती काढण्यास मदत केली. मात्र, त्यापुढे यात आपण काहीएक करू शकत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. केंद्र सरकारकडून ऑनलाईन व्यवहारांना चालना दिली जात असताना, सतत घडत असलेल्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. यूपी, एमपीमधील प्रसिद्ध टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

ओटीपी कुणालाही शेअर करायचा नाही हे मला माहित आहे. त्यामुळे फसवणूक होणार नाही, असा माझा समज होता. मात्र, केवळ एका लिंकमुळे माझी मोठी फसवणूक झाली. मी गूगल पेच्या माध्यमातून अन्य खात्यावर पैसे पाठवलेले होते. मात्र, तो व्यवहार पूर्ण झालेला नसल्याने मी संबंधित अ‍ॅपद्वारे तक्रार केलेली होती. याच तक्रारीचा संदर्भ देत मला कॉल आल्याने मी संबंधित व्यक्तीशी बोललो आणि माझे मोठे आर्थिक नुकसान झाले. बँकेने न्याय द्यावा.

– चंद्रभान राक्षे, तक्रारदार