HDFC बँकेत ३६ लाखांचा पीककर्ज घोटाळा, कर्मचारी फरार

शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा घेतला गैरफायदा; बनावट दाखल्यांमुळे बँकेपुढेही आव्हान

Crop loan

प्रवीण पवार, सटाणा

शहरातील एचडीएफसी बँकेत लाखो रुपयांचा पीककर्ज घोटाळा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बागलाण तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बँक प्रशासनानेदेखील यास दुजोरा दिलाय. १६ सप्टेंबरपर्यंत ९ शेतकर्‍यांनी दिलेल्या तक्रार अर्जांनुसार प्रथमदर्शनी ३६ लाख रुपयांची अफरातफर झाली आहे. आगामी काळात या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

याप्रकरणी अद्याप सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसला तरी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार बँकेच्या कृषी विभागातील कर्मचारी मनोज मेधने (रा. मेधने वस्ती, ता. देवळा) कारवाईच्या भीतीने १२ सप्टेंबरपासून फरार झाला आहे. मेधने याच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार देवळा पोलीस ठाण्यात दिली असून, देवळा पोलिसांचे एक पथक गुरुवारी (दि.१६) एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेत तपासासाठी आले होते.

बागलाण तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी एचडीएफसी बँकेतून लाखो रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बँकेचा कर्मचारी मनोज मेधने याने अनेक शेतकर्‍यांना व्याजासह मूळ मुद्दल रकमेत सूट देऊन तडजोड करण्याचे आमिष दाखवून बँक प्रशासनाला अंधारात ठेवत अनेक शेतकर्‍यांकडून लाखो रुपये परस्पर वसूल केले. शेतकर्‍यांनी कर्जमुक्त होण्यासाठी मुख्य सूत्रधार मेधनेकडे दिलेली रक्कम त्याने बँकेत न भरता स्वतःकडेच ठेवली. मात्र, संबंधित शेतकर्‍यांना त्याने ती रक्कम बँकेत भरल्याचे भासवत बँकेचा बनावट शिक्क्यामार्फत पैसे भरल्याच्या बोगस पावत्या दिल्या आहेत.

शेतकर्‍यांनी बँकेच्या हप्ते संपलेल्या दाखल्याची मागणी केल्याने सूत्रधार मेधनेने बँकेचे बनावट लेटरहेड छापून खोटे सही शिक्के मारून देत बँकेचे कर्ज भरल्याचे दाखले शेतकर्‍यांना दिल्याचं समोर आलं आहे. मेधने याने दिलेले बनावट दाखले शेतकर्‍यांनी तलाठ्यांकडे सादर केल्याने तलाठ्यांनीदेखील बँकेकडे कोणतीही शहानिशा न करताच काही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा केल्याने सूत्रधार मेधनेच्या कारनाम्यामुळे शेतकर्‍यांसह एचडीएफसी बँक अडचणीत आली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांसह वकील सटाणा शाखेत

लाखो रुपयांची झालेली अफरातफर, पैसे भरल्याच्या बनावट पावत्या, कर्जफेड नसतानाही शेतकर्‍यांना मिळालेले नील दाखले, कर्जाची थकीत रक्कम जैसे थे असताना देखील सातबारावरील बोजा कमी होणे अशा गंभीर बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकासह बँकेचे वकील दाखल झाले.

शेतकर्‍यांची बँकेकडे तक्रार

बागलाण तालुक्यातील फोफिर, बिजोटे, कोळीपाडा, बिजोरसे, रामतीर येथील शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे.
आपल्याला न्याय मिळावा व संबंधितांवर कारवाई करावी,
अशी लेखी तक्रार शेतकर्‍यांनी बँकेकडे केली आहे. त्यासाठी अर्जासोबत बनावट पावत्या, बोगस नील दाखले व सातबारे देखील जोडले आहेत.

मोठे मासे लागणार गळाला

अफरातफर प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनोज मेधने बेपत्ता असला तरी त्याला मदत करणारे बँकेतील इतर सहकारी, बनावट शिक्के व लेटरहेड बनवून देणारे, बँकेकडे शहानिशा न करता बोगस नील दाखला पाहून सातबारा वरील बोजा कमी करणारे तलाठी अडचणीत येणार आहेत. आगामी काळात तपासाची सूत्रे कशी फिरतात याकडे तालुकवासीयांचे लक्ष
लागून आहे.