भिवंडीत तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक

दोन गुन्ह्यांमध्ये आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

भिवंडी । भिवंडी शहरामध्ये दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या फसवणुकीसंदर्भात एकूण आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तब्बल ८ कोटी ३९ लाख ७२ हजार ६५२ रुपयांची फसवणूक केली गेली आहे. पहिल्या गुन्ह्यात सतीश तेजसिंह पुरोहित यांच्या पत्नीच्या नावे हरिधारा कॉम्प्लेक्स अंजुरफाटा येथे राज मोबाईल नावाचे मोबाईल दुकान असून त्याठिकाणी लालजी पेठा कंजारीया, उपेंद्र विनोद कंजारीया, रवि विनोद कंजारीया, विपुल लालाजी कंजारीया आणि जिगर हरेश कंजारीया सर्व राहणार कामतघर यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादीची फसवणूक करण्याचा कट रचला.

त्यासाठी सर्वप्रथम फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या राज मोबाईल दुकानातील मोबाईल बजाज कंपनीचे कर्ज देवून विक्री केल्याचे भासवुन त्याची खोटी बिले बनवून तसेच सॉफ्टवेअर च्या मदतीने खोट्या नोंदी बनवून संगणका मधील काही नोंदी डिलीट केल्या. त्या आधारे या पाच जणांनी एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान तब्बल ८९लाख ५२ हजार ७८३रुपयांचे मोबाईल विक्री करून त्याचे पैसे स्वतः च्या बँक खात्यात परस्पर वळवून मोबाईल दुकानदाराचा अन्यायाने विश्वासघात केल्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी पाच जणां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत शहरातील खोका कंपाऊंड येथील निरव सिल्क मिल्स चे संचालक निरव विनोद शहा यांनी सय्यद झमीर ,शिफा झमीर सय्यद व सैफ अहमद शकील शेख हे संचालक असलेल्या झेनीला ट्रेडिंग प्रा. ली. कंपनीस ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या काळात कच्चा माल देऊन तयार कापड बनवून देण्या साठी १७ कोटी ७ लाख ६८ हजार १६६ रुपयांचा फॅब्रिक माल दिला होता. फिर्यादी व्यवसायिकास झेनीला ट्रेडिंग प्रा. ली.कडून फक्त ९कोटी ५७ लाख ४८ हजार २९९ रुपयांचा माल परत केला.वेळोवेळी मागणी करून ही कंपनीने ७ कोटी ५० लाख १९ हजार ८६७ रुपयांचा माल परत न करता अपहार केला .या बाबत आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने निरव शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात या तिघा संचालकां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.