नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अल्पसंख्याक विभाग आयोजित शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा, वाशी येथील सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुस्लीम समाज हा देशाचा एक भाग असून या समाजाचा देशाच्या स्वतंत्र्यामध्ये मोठा वाटा आहे. पण काही जण मुस्लीम समाजामध्ये भीतीचे वातावरण तयार करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोणावरच अन्याय होऊ देणार नाही व याठिकाणी सर्व सुरक्षित राहतील, असे वक्तव्य त्यांनी केले. (Free higher education for girls from minority communities Testimony of Ajit Pawar)
हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?
अजित पवार म्हणाले की, आर्थिक कारणांमुळे अल्पसंख्याक समाजामध्ये अनेक मुली उच्च शिक्षण करत नाही. पण शासनाने आता निर्णय घेतला असून आठ लाखांच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ सर्वच जाती धर्मातील मुलींना मिळणार आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गतवर्षी शासनाने 500 कोटी दिले होते. या वर्षी 1500 कोटी रुपये देण्याचा मानस आहे. नांदेड, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, मुंबई येथे उर्दु हाऊस सुरू करण्याचा मानस असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, काही कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असले की, लोकसभा व विधानसभेसाठी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींना स्थानिक स्वराज्य संस्थांचा नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये काय होणार? असा प्रश्न पडला असले. पण आपण पंधरा वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना लोकसभा व विधानसभेमध्ये एकत्र लढायचो. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेगळया लढायचो हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन कामाला लागण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच अल्पसंख्या विभागाच्यावतीने केलेल्या ठरावामध्ये महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून बारकाईने लक्ष घालून ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.
हेही वाचा – NCP : महेश जाधव राष्ट्रवादीत; ‘नमक हराम’ चित्रपटाचा दाखला देत अजित पवारांची मनसेवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाअध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, कॉंग्रेस 70 वर्ष सत्तेत असताना जे निर्णय घेऊ शकली नाही. ते सात ते आठ महिन्यांमध्ये घेण्यात आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना अडचणी निर्माण होत होत्या. पण आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युतीमध्ये सामील झाल्यांनतर अल्पसंख्याकसाठीही निर्णय घेता येत आहेत, असे सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान, या मेळाव्यात राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी, तसेच अल्पसंख्याक निरिक्षक नजीब मुल्ला, राज्यप्रमुख इंद्रिस नायकवडी, राज्यकार्य अध्यक्ष वसीम बुऱ्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.