5 ते 10 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या वाटेवर

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या वाटेवर असणार आहे. 26 सप्टेंबरपासून राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच 8 ऑक्टोबरपासून पाऊस मुंबईतून निरोप घेणार असण्याची हवामान विभागाकडून शक्यता वर्तवली जात आहे.

जून महिन्यात पाऊस मध्यम स्वरूपाचा होता. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. राज्यभरात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला होता अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

धरणांच्या पाण्यात वाढ
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 85% हून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कापसाला फटका

राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अति पावसामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कापसाचे उत्पन्न कमी होणार आहे.


हेही वाचा :

मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम पाऊस, विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट