मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज (ता. 08 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठीचे निर्यात धोरण, आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती, आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे, नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दिवाळी सणाला काहीच दिवस असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यातील काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे ज्या पिकांचे नुकसान झाले त्या पिकांना योग्य भाव मिळणे आता जास्त महत्त्वाचे आहे, यासाठी सरकारने मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (From teacher recruitment to export policy…, important decisions were taken in cabinet meeting)
हेही वाचा – खुर्चीचा मोह आवरेना! उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा स्टिकर काढून सत्तार झाले विराजमान
त्याशिवाय गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येणार असून राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे. विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असून याचा मोठा फायदा संत्रा उत्पादकांना होणार आहे. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ करण्यात येणार असून नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय
- धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण)
- मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)
- अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार (वैद्यकीय शिक्षण)
- मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार (पर्यटन विभाग)
बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार (गृह विभाग) - महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार (पशुसंवर्धन)