युवा नेता ते बुद्धिमान संसदपटू

राहुल यांच्या जीवाभावाचा आधार निघून गेल्यामुळे काँग्रेसचे खूप मोठे नुकसान

From young leaders to intelligent parliamentarians rajeev satav
युवा नेता ते बुद्धिमान संसदपटू

कोरोनाने होत्याचे नव्हते केले असून अजून या देशाला आणखी काय काय भयानक बघावे लागणार आहे, अशी मृत्युची गिधाडे सर्वत्र घिरट्या घालत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आ वासून उभी असताना देशाचे शिर्षस्थ नेतृत्व नरेंद्र मोदी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा हा देश गंगेच्या पाण्यावर वाहणाऱ्या प्रेतांचा देश झालेला असतो. आणि वाईट म्हणजे एवढे होऊनही मन की बात गाताना मोदी जेव्हा भयानक परिस्थितीला नाकारतात तेव्हा या देशात सामान्य माणूस काय सोडाच पण ज्यांना वेळेत उपचार मिळू शकतात अशी मोठी माणसेही दूर प्रवासाला निघून जातात… राजीव सातव हे त्यापैकी एक. अवघे ४६ वय हे त्यांच्या जाण्याचे नव्हते. पण कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना आणखी एका नव्या विषाणूने गाठले आणि ते हे जग सोडून गेले. कोरोनाचे हेच तर वैशिष्ट्य असून तो माणसाचे शरीर नव्या विषाणूंचे आगार बनवतो आणि हा माणूस जगेल असे वाटत असताना या जगाचा निरोप घेत आहे.

गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत होती. त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायला लागले. तसेच त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सामान्य स्थितीत आली होती. मात्र त्यांची प्रकृती सुधारत असताना त्यांना मृत्यूने गाठले. खूप वाईट वाटते हे सर्व बघताना, लिहिताना. कारण गुणी चांगली माणसे अचानक मोठ्या प्रवासाला निघून जातात तेव्हा मन सैरभर होते. खूप वेळा सातव यांना भेटता आले नाही, कारण त्यांचा वावर हा अधिक काळ दिल्लीत होता. पण, मुंबईत ते कधी आले की त्यांना भेटण्यात आनंद असायचा. तो अशासाठी की छोट्या वयात त्यांची भारतीय जनमानस आणि राजकारण याची असलेली प्रगल्भ समज. देशपातळीवरचा कुठलाच विषय असो अगदी पोटतिडकीने आणि माहितीपूर्ण मांडणारे ते नेते होते आणि तेच त्यांच्या संसदेतील भाषणांमध्ये दिसून यायचे.

२०१४ साली मोदी लाटेत सुद्धा निवडून आलेले राजीव सातव यांनी स्वतःहून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या हुशारपणाची जाणीव होती. पक्ष संघटनेच्या कामाला वाहून घेण्याचा त्यांचा निर्णय हा आज काँग्रेस ज्या वाईट परिस्थितीमधून जात आहे, त्यासाठी खूप आधाराची गोष्ट होती. पण आता तोच राहुल यांच्या जीवाभावाचा आधार निघून गेल्यामुळे काँग्रेसचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत आणि २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या देशाला नाथ पै, मधू लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज्य अशा एका पेक्षा एक सरस संसदपटूंची मोठी परंपरा आहे. याच रांगेत आता एक नाव येऊ घातले होते ते म्हणजे राजीव सातव. असे अभ्यासू खासदार संसदेत असणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणारी भारताची ती मोठी आधारस्तंभ असतात. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातून सातव यांच्यासारखे अभ्यासू खासदार निर्माण होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते. ‘महाराष्ट्रातले खासदार हे संसदेच्या वाचनालयात दिसण्याऐवजी अधिक काळ हे कॅन्टीनमध्ये दिसतात आणि ते बरोबर नाही’, असे निरीक्षण दिल्लीत नोंदवले गेले आहे. अशा वेळी सातव यांच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला आणि देशाला खूप मोठी गरज होती.


हेही वाचा – काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन