घर महाराष्ट्र पुणे भावी मुख्यमंत्री : पवारांच्या बारामतीमध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी; लावले 'या' नेत्याचे फोटो

भावी मुख्यमंत्री : पवारांच्या बारामतीमध्ये काँग्रेसची पोस्टरबाजी; लावले ‘या’ नेत्याचे फोटो

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याचपार्श्वभूमीवर उत्साही कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याचे फोटो भावी मुख्यमंत्री या बॅनरवर लावताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत काँग्रेसनेही अशी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Future CM : Pawar’s poster campaign in Baramati; Photos of ‘this’ leader are attached)

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? यावरून दररोज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. हे लोण आता बारामतीमध्येही पोहोचले आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहेत. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. बारामती शहर काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते रोहित बनकर यांनी नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत हे बॅनर लावले आहेत.

- Advertisement -

बारामतीसह पिंपरी-चिंचवडमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शगुन चौक आणि इंदिरा गांधी उड्डाण पुलावर असंघटित कर्मचारी कामगार संघ काँग्रेसच्या वतीनेही बॅनरबाजी करण्यात आली आहे. याआधी भंडारा आणि नागपूरमध्येही नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लागले होते.

अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारी पोस्टर मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयासमोर लावण्यात आली होती, तर जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही मुंबईत असेच पोस्टर लावले होते. नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री करत पोस्टरबाजी केली होती. त्यामुळे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची भर पडली आहे.

- Advertisement -

चार वेळा आमदार, एकेकाळचे खासदार, विधानसभा अध्यक्ष आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी सातत्याने यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी सर्व विरोधकांना तोंड देत आपली राजकीय प्रतिमा कायम राखली. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. आता त्यांनी राज्यपातळीवर एक तगडा राजकीय नेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

 

- Advertisment -