गडचिरोलीत भुसुरुंग स्फोट; पोलीस उपनिरीक्षकासह जवान शहीद

गडचिरोलीत भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षकासह जवान शहीद झाले असून एक जवान गंभीर जखमी आहे.

gadchiroli two jawans martyred three injured in naxal attack
गडचिरोलीमध्ये नक्षलवादी हल्ला

एकीकडे देशात कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र, सीमारेषेवर नक्षलवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील अलदंडी – गुंडूरवाहीच्या जंगलात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात पोलीस उपनिरीक्षक धानजी होनमने (३०) आणि सी ६० पथकाचे शिपाई किशोर आत्राम शहीद झाले आहेत. तसेच या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी शहीद झाले असल्याची शक्यता गडचिरोली पोलीस दलाने व्यक्त केली आहे.

दसरु कुरचामी जवानाची प्रकृती गंभीर

गडचिरोली येथे शीघ्र कृती दल आणि सी-६० पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी प्रथम भूसुरुंग स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेच नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले आहेत. तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली आणि दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले आहेत. तर दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.

शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, तर जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळावर चकमक सुरु आहे. शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.


हेही वाचा – जम्मू काश्मीरच्या चकमकीत हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार; एक जवान शहीद