घरमहाराष्ट्रनितीन गडकरी, अहमद पटेल भेटीत डील?

नितीन गडकरी, अहमद पटेल भेटीत डील?

Subscribe

शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा न देण्याच्या बदल्यात वड्रा, चिदंबरम् यांच्यावरील संभाव्य कारवाई शिथील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी सकाळी घेतलेल्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या भेटीचा थेट महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंध असून सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यावरील ईडीची कारवाई रोखणे आणि सध्या तुरुंगात असलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांच्या मनी लॉण्ड्रींगप्रकरणी जामिनात भाजपने खोडा न घालण्याच्या अटीवर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी डील काँग्रेस आणि भाजपमध्ये झाल्याची शक्यता दिल्लीतील सुत्रांकडून वर्तवली जात आहे.

राज्यात सत्तास्थापनेबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदावर शिवसेना अडून आहे तर भाजप काही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्याला पाठिंबा द्यावा, असा फॉर्म्युला निश्चित होत होता. तसे झाले तर हातून महाराष्ट्राची सत्ता जाणार याची चिंता भाजपच्या पक्षश्रेष्ठींना होती. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील सत्ता हातची जाऊ द्यायची नाही, असे भाजपने निश्चित होते. त्यासाठी काँग्रेसला पाठिंब्यापासून रोखणे आवश्यक होते.

- Advertisement -

काँग्रेसने शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा द्यायचा नाही. मात्र त्याबदल्यात रॉबर्ट वड्रा यांच्यावरील कारवाई शिथिल करायची तसेच तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम् यांना मिळाणार्‍या जामीनात खोडा घालयचा नाही, असे ठरवण्यात आले. अमित शहा यांचा तो संदेश गडकरीमार्फत अहमद पटेल यांना बुधवारी सकाळी देण्यात आला असण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेबाबत हालचाली जलद होत आहेत. गुरुवारी काँग्रेस नेते सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी आणि काही काँग्रेसचे नेते हे जरी शिवसेनेला पाठिंबा देण्यास समर्थन करत असले तरी काँग्रेस नेते राहुल गांधी हे शिवसेनेला पाठिंबा देऊ नये या विचाराचे आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिला तर देशभरात त्याचे वाईट परिणाम होतील, अशी राहुल गांधी यांची धारणा आहे. मात्र त्याचवेळी भाजपला एका राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी मिळत असेल तर ती का नाकारावी, असा एक विचार सध्या काँग्रेसमध्ये आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी दिवसात राज्यातील राजकारण कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -