कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, मनसेची मागणी

संग्रहित छायाचित्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. दरम्यान, कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे.

राज्यपालांनी सुधारायच नाही असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळत नाही तिथं का ज्ञान पाजळता? गडकरीजी, पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

यांना अजून राज्यपालपदी ठेवता तरी कसं?- संभाजीराजे छत्रपती

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादमध्ये आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. बोलताना कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो, तेव्हा आम्हाला शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण? त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र बोस, कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू, तर कोणाला गांधीजी चांगले वाटायचे. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेव्हरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील, शिवाजी महाराज जुन्या काळातली गोष्ट आहे. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.


हेही वाचा : छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, रोहित पवारांचा राज्यपालांवर घणाघात