घरमहाराष्ट्रराजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत - नाना पटोले

राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत – नाना पटोले

Subscribe

हकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी ५५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

- Advertisement -

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

विधानसभेत ५० वर्ष सहभाग

गणपतराव देशमुख यांची राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. ११९९ लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. २०१२ मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.

- Advertisement -

सर्वाधिक वेळा आमदार

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -