कसब्यात भाजपकडून पैशांचा पूर, काँग्रेसच्या आरोपानंतर झटापट; व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून मतदारांना पैशांची रसद पुरवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या संबंधित प्रकरणाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या कार्यकर्त्यांसह पैशांचे वाटप करत होते. त्यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या झटापटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये गणेश बिडकर हे काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहेत. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात पोहोचले असता दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

भाजपचे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुस्लिम समाजातील मतदारांना मतदान प्रक्रिया समजून सांगत होते. तसेच मतदानासाठी आवश्यक त्या स्लीप वाटत होते. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही भाजपच्या उमेदवाराला मतदान का करता?, असं विचारून मारहाण केल्याचा आरोप गणेश बिडकर यांनी केला आहे. तर गणेश बिडकर हे पैसै वाटत होते आणि त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली, असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील चौकशी केली जात आहे.


हेही वाचा : मनसेचा एकच आमदार, त्यांनी पक्षावर दावा केला तर… अजित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल