ठाणे : राज्यात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार सत्तेवर आहे. महाराष्ट्रात दुसऱ्यांना महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. पण यंदा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमध्ये भाजप वारंवार शिवसेनेला आव्हान देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात राज्याचे मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. तसेच, ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. अशा शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजप गणेश नाईकांच्या माध्यमातून काबिज करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (ganesh naik organize janata darbar in thane shiv sena eknath shinde thane)
एकिकडे भाजपचे जेष्ठ नेते गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेत आहेत तर, दुसरीकडे त्यांनी यापुढे ठाण्यात ‘ओन्ली कमळ’ अशीही घोषणा केली आहे. त्यानुसार, “मी गडकरी रंगायतनमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार आहे”, अशी घोषणा गणेश नाईक यांनी केली.
याशिवाय, “ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत ओन्ली कमळ फुलवायचे आहे. शहरातील भाजप नेत्यांची तीच इच्छा आहे, असे सांगत पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे कामही माझे आहे”, असं मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले.
परिणामी गणेश नाईक यांच्या जनता दरबार आणि ओन्ली कमळ या घोषणांमुळे एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.