मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आला असतानाच पुण्यातील एका गणेश मंडळानं केलेल्या देखाव्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या देखाव्यात अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसत आहेत. या देखाव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे. हा देखावा आमच्या अंतर्मनातील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Ganpati scene Pune Ajit Pawar Amol Mitkari)
अमोल मिटकरी म्हणाले की, पुण्यातील गणेश मंडळानं जो देखावा सादर केला आहे, ती महाराष्ट्रातील प्रत्येकाची भावना आहे. मी यापूर्वी देखील अशाप्रकारची भावना बोलून दाखवली आहे. परंतु अजित पवारांना अशाप्रकारचं बोललेलं आवडत नाही. कारण लोकशाहीत प्रॅक्टिकल असणं महत्त्वाचं असतं, असं त्याचं मत असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – …हाच पॅटर्न महायुती सरकारच्या हाती, दुष्काळी स्थितीवरून विजय वडेट्टीवारांची टीका
आमच्या अंतर्मनातील देखावा
आगामी निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि या सोहळ्याला महाराष्ट्रातील मुख्य नेते उपस्थित राहावे, अशा आशयाचा देखावा पुण्यातील गणेश मंडळाने साकारला आहे. हा देखावा आमच्या अंतर्मनातील देखील आहे. आम्ही गणपतीकडं घातलेलं साकडं पूर्ण होईल, असा मला विश्वास आहे. आगामी काळात 2024 मध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाईल, त्यात दुमत असण्याचं कारण नाही, अशी ठाम भूमिकाही अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदारांची राजकीय तिरडी तयार, फक्त हे राम म्हणणं बाकी; राऊतांचा घणाघात
सध्या राष्ट्रवादीतील सर्वकाही शांत
महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडखोरीनंतर प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची साथ सोडली होती. मात्र नुकत्याच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांचा फोटो व्हायरल झाला होता. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः शरद पवार यांच्या भेटीचा फोटो शेअर केला असून नवीन संसदेतील एक संस्मरणीय दिवस असल्याचे लिहिले आहे. याशिवाय अधूनमधून अजित पवार आणि शरद पवार यांचीही भेट झाली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यापार्श्वभूमीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, शरद पवारांना सर्वच जण भेटत असतात, आम्ही अधुनमधून भेटत असतो. सध्या राष्ट्रवादीतील सर्वकाही शांत आहे, असेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.