Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र गावपळण... तळकोकणातील एक अनोखी परंपरा

गावपळण… तळकोकणातील एक अनोखी परंपरा

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील चिंदर,आचरे, वायंगणी या गावांमध्ये पाळली जाणारी "गावपळण" ही परंपरा पिढ्यान - पिढ्या चालू आहे.

तळकोकण हे तिथल्या स्वर्गीय सौदर्यासाठी प्रसिद्ध आहेच पण तेथील रूढ़ी-परंपरा, रीतिरिवाज संस्कृती अनोखी आहे . अशीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील चिंदर,आचरे, वायंगणी या गावांमध्ये पाळली जाणारी “गावपळण” ही परंपरा पिढ्यान – पिढ्या चालू आहे. गावपळण म्हणजे गावातील देवतेच्या हुकूमाने गावातील सर्व धर्मीय, सर्व समाज बांधव आपल्या कुटुंब-कबिल्यासह पाळीव प्राणी, जनावरे यांना घेऊन गावाच्या वेशी बाहेर तीन दिवस – तीन रात्र वस्तीस राहतात. या काळात गावात कोणीही रहात नाही. अशी ही अनोखी परंपरा असलेली चिंदर गावची गावपळण यावर्षी होत आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी चिंदर गावातील श्री देव रवळनाथ मंदिरात बारा/पाच मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र जमून देवतेला यावर्षी गावपळण करावी का याबाबत कौल (प्रसाद) लावला. देवतेने त्यासंदर्भात हुकूम दिल्यानंतर गावातील ग्राम पुरोहितांकडे जाऊन पंचांग बघून त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर म्हणजेच दिनांक 18 नोव्हेंबर 2022 पासून पुढे तीन दिवस – तीन रात्री गावातील सर्व लोक गाव घरदार सोडून गुरे – वासरे, पाळीव प्राणी,कोंबडी, कुत्री, मांजरे यासह वेशीबाहेर राहणार आहेत. विज्ञानाशी सांगड घालत या परंपरेकडे पाहताना असे दिसते की, आपली भारतीय संस्कृती निसर्गाशी एकरूप झालेली आहे.

त्यामुळे त्याकाळी विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टी सर्व सामान्य लोकांना समजण्यापलीकडे असल्याने प्रत्येक गोष्टीत देव – धर्म आणला की प्रत्येक भारतीय मनुष्य त्याचे नक्कीच अनुकरण करेल आणि करतोच. त्यामुळे भूत – पिशाच्च यांच्यासाठी तीन दिवस गाव सोडून बाहेर जावे त्यासाठी देवाचा हुकूम घेणे अशी परंपरा पडली असावी. यामागे जुनी जाणकार मंडळी अशी कथा सांगतात की, चिंदर गावात पूर्वी एक वृद्ध स्त्री तिच्या घरात राहत होती बाकी संपूर्ण गाव ओसाड (गावात कोणीही कुठेही मनुष्यवस्ती नसलेला) होता. त्या गावात एक वराह (डुक्कर) माजला होता. एके दिवशी मामा आणि त्याचा भाचा फिरत असताना जंगलात दूरवर त्यांना एक दिवा मीणमीणताना दिसला तेव्हा ते दोघे तिथे गेले असता त्या वृद्ध स्त्रीने त्यांचे आदरातिथ्य केले व या गावात एक वराह (डुक्कर) माजला असून तो खूप त्रास देतो असे सांगितले. त्यावर त्या दोघांनी त्या डुक्कराचा कायमचा बंदोबस्त केला. तेव्हापासून त्यांनी या गावात वस्ती केली आणि हा गाव वसवला म्हणून चिंदर या गावाला ‘मामा भाच्यांचा गाव’ असे म्हणतात. त्यानंतर भूत पिशाच्च गावातील देवतेला शरण गेली आणि आता आम्ही बाहेरच्या गावात वस्ती करतो परंतु तुझ्याकडे आम्हाला वस्ती करायची संधी कशी मिळेल असे विचारले असता तीन वर्षानंतर या गावातील सर्व लोक पाळीव प्राणी जनावर यांसह हा गाव सोडून वेशी बाहेर जाऊन संसार थाटतील त्यावेळी तुम्ही या गावात संचार करावा असे सांगितले.

- Advertisement -

तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे. गांवपळण ची तारीख ठरल्या नंतर श्रीदेव रवळनाथ मंदिरात सर्व मानकरी, ग्रामस्थ जमतात देवतरंग यांचे अवसारी घडीवर (घोंगडीची बैठक) बसून त्यांना धूप दाखविला जातो. त्यांच्या अंगात संचार झाल्यानंतर देवस्वरूपात बोलून सर्व ग्रामस्थ मानकरी यांना आश्वस्त करतात की तुम्ही जसे तुम्ही सर्व लोक गावाच्या बाहेर जाल तसेच सर्वांना सुखरूप मी गावात पुन्हा घेऊन येईन या काळात गावातील प्रत्येक घराचे रक्षण मी करेन असा आशीर्वाद घेतात. त्यानंतर ढोल वाजवून सर्वांना गाव सोडण्याचा इशारा दिला जातो. तसे प्रत्येक जण आपले साहित्य, गुरे – जनावरे, पाळीव प्राणी घेऊन घराला कुलूप लावून दरवाजावर माडाचे साऊळ (झावळ्या) आणि काटेरी शिरड (काटेरी झाडाची फांदी) लावून गाव सोडून गावाबाहेर निघू लागतात. आजवर इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या या गावपळण काळात गावात एकही चोरी झालेली नाही तशी कोणाची हिंमत होत नाही. सर्व सरकारी कार्यालये मात्र चालू राहतात. त्याला कोणी बाधा आणत नाही. पोलीस आपली ड्युटी बजावताना गावात फेरफटका मारत लक्ष ठेवून असतात. निर्मनुष्य गाव असल्यामुळे थोडे भीतीचे वातावरण असते. या गावपळण उत्सवामध्ये सर्व समाज बांधव, सर्वधर्मीय सहभागी होतात.गाव सोडून जाण्याची कोणावरही सक्ती केली जात नाही. प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे यात सहभागी होतो हे विशेष आहे.

- Advertisement -

या ‘गावपळणीनंतर’ चिंदर गावात अजून एक वेगळी परंपरा आहे ती म्हणजे गावपळण झाल्यानंतर तीन दिवस तीन रात्री पूर्ण झाल्यावर बारा/पाच मानकरी आणि ठराविक ग्रामस्थ श्री रवळनाथ मंदिरात काहीही न बोलता आवाज न करता एकत्र जमून देवतेला गाव पुन्हा भरण्यासंदर्भात (गावात परतण्यासंदर्भात) कौल लावतात. देवाने होकार दिला तर त्या दिवशी संध्याकाळी सर्व लोक आपले पाळीव प्राणी, जनावरे, साहित्य यासह आपापल्या घरी पुन्हा परततात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील देव तरंग यांचे अवसारी बारा/पाच मानकरी व ग्रामस्थ यांच्यासह चिंदर तलावाच्या वरील बाजूस बसकी ब्राह्मण या ठिकाणी पळून जातात. याला “देवपळण” असे म्हणतात. त्या ठिकाणी तीन दिवस तीन रात्र सर्वांचा मुक्काम असतो. सकाळी (पहाटे), संध्याकाळी (कातरवेळी),आणि रात्री अशा तीन वेळा देवतेला धूप घालून अवसारी यांच्या अंगात संचार येऊन ते गाव – रहाटी आणि एकंदर गावातील समस्या सोडवतात धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण, रोगराई यातून मुक्तता व्हावी याकरिता आपण तीन – चार दिवस निसर्गाचा सानिध्यात ट्रिप ला जातो . या प्रमानेच सर्वांनी एकत्र निसर्गाच्या सन्निध्यत रहावे यासाठी कदाचित ही परंपरा पडली असावी.

या गावपळण दरम्याने सर्व चाकरमानी पावणे – सोयरे गावाकडे येतात.गावाच्या वेशी बाहेर जाऊन नैसर्गिक साधनसामग्रीपासून तयार केलेले खोपटे बांधून प्रत्येक कुटुंब आपला संसार थाटतात. या काळात सर्व एकत्र येत मज्जा मस्ती करतात.घरातील महिला भगिनी मोठ्या उत्साहाने नवनवीन पदार्थ बनवतात,त्यांची देवाणघेवाण होते .पत्त्यांचे डाव रंगतात, विटी – दांडू, लगोरी, क्रिकेट, कबड्डी, खो – खो, पोहणे असे शारीरिक खेळ खेळले जातात. रात्रीच्या वेळी बैठे खेळ, भजने, वारकरी दिंडी नृत्य, भेंड्या लावणे अश्या खेळानी विरंगुळ होतो .गावातील मंडळी एकत्र गुण्यागोविंदाने राहत असल्यामुळे एकमेकांची सुख- दुःख वाटली जातात. यातून “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!” याचा प्रत्यय येतो. गावातील वृद्ध, मोठी माणसे पुराणातील कथा, त्यांच्या बालपणीच्या आठवणी सगळ्यांना सांगतात. यातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचार प्रवाहाचे संक्रमण होते. आपल्या संस्कृतीचा एक एक धागा उलगडत जातो या अशा रुढी का व कशा पडल्या आणि त्या का पाळाव्यात हा भाग वेगळा सध्या सर्वत्र वाढते प्रदूषण रोगराई यापासून मुक्तता मिळविण्यासाठी साहजिकच निसर्गाच्या सानिध्यात ऑक्सिजन चा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने शरीर प्रकृतीसाठी त्याचा लाभ होतो.

सकाळचे चहा-न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण सर्वजण एकत्र बसून झाडाखाली निसर्गाच्या सानिध्यात करतात. याला सहलीचा हा लहान प्रकार वनभोजन म्हणावे लागेल. एकमेकांकडे तयार केले जाणारे जेवण, विविध पदार्थ सगळ्यांना वाटले जातात. त्यामुळे नवीन पिढीला पर्यायाने सर्वांमध्येच आपल्याकडे असलेले इतरांना द्यावे किंवा वाटून घेण्याची वृत्ती वाढीस लागते. या गावातील माहेरवाशीणी या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपापल्या माहेरी येतात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. तसेच या काळात सर्व लोक एकत्र आल्याने आपापसातील हेवे – दावे, मतभेद, तंटे याचे निरसन होते. एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होण्यास मदत होते. या काळात काही लोक आपल्या पाहुण्यांकडे, मामा, आत्या यांच्याकडे जातात. काही महिला आपल्या माहेरी जातात. त्यानिमित्ताने त्यांना आपल्या माणसांमध्ये वेळ घालवता येतो. या काळात वेशीबाहेर शेतावर, रानावनात वास्तव्य असल्यामुळे लाईट उपलब्ध नसते. त्यामुळे टीव्ही, मोबाईल अशा साधनांपासून काही काळ माणूस दूर होऊन आपल्या माणसांमध्ये मिसळतो.खरया अर्थाने आपल्या माणसांसाठी वेळ देतो . रात्रीच्या वेळी तेलाचे/रॉकेलचे दिवे, मेणबत्ती, कंदील, गॅस बत्ती याच्या उजेडात जेवण, गप्पा, खेळ रंगतात.

हे सर्व वातावरण पाहून पूर्वजांनी चालू केलेल्या परंपरेचा अभिमान वाटतो. लहान मुलांना या काळात शाळेला सुट्टी असते त्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा रहात नाही परंतु ही मिळालेली सुट्टी नंतरच्या काळात भरून काढली जाते. लहान मुले दिवसभर मजा करून रात्री आजी आजोबांकडे गोष्टी ऐकत झोपी जातात.यावेळी ना कोणा हिंस्र श्वापदांची, ना सरपटणाऱ्या प्राण्याची कोणालाही भीती वाटत नाही ना असा त्रास कधी झाला . हे थंडीचे दिवस असल्यामुळे निसर्गतःच वातावरणात गारवा असतो. त्यामुळे पंखा, कूलर, एसी यासर्व कृत्रिम साधनव्यतिरिक्त शांत झोप लागते .त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ही ‘गावपळण’ नक्कीच अनुभवावी. इथे फक्त आनंद च आपल्याला अनुभवता येतो. अगदी आनंदी – आनंदss याs झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावेss आकाश पांघरावेs ताऱ्याकडे पहावे या.. झोपडीत माझ्या… या ओळींचा प्रत्यय येतो. मुळात गावपळण हा अलौकिक सोहळा सांगून, वाचून वा वीडिओ पाहून आनंद घेता येणारी गोष्ट नाही त्यासाठी ती प्रत्यक्षात अनुभवावीच लागेल.


हे ही वाचा – छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, रोहित पवारांचा राज्यपालांवर घणाघात

गावपळण… तळकोकणातील एक अनोखी परंपरा
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -