मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सर्रास येतात गावठी कट्टे

उमरठीला जाऊन थांबतो तपास, कारवाईनंतरही कट्ट्यांचा सुळसुळाट

सुशांत किर्वे । नाशिक 

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गावठी कट्ट्यांचा वापर वाढत आहे. पोलिसांकडून मागील दोन वर्षात तब्बल 124 गुन्हेगारांना गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 26 कट्टे, 54 काडतुसे जप्त केले. मध्यप्रदेशातील उमरठी गावातून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, या गावापर्यंतच या कट्ट्यांचा तपास थांबत आहे. अतिदुर्गम भाग आणि परराज्य असल्याने पोलिसांनी कारवाईत अडथळे येत असल्याने तस्कारांच्या मुसक्या आवळण्यात अडचणी येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून नाशिक शहर व जिल्ह्यात गावठी कट्टे अगदीच सहज उपलब्ध होत आहेत. मागील दोन वर्षात नाशिक ग्रामीण पोलिसांनी 101 गुन्ह्यांमध्ये 26 कट्टे व 54 काडतुसे जप्त केले आहेत. मागील वर्षभरात पोलिसांनी जेवढे कट्टे पकडले, तेवढच अवघ्या सात महिन्यांत चालू वर्षी पोलिसांनी जप्त केले आहेत. यातून कट्ट्यांच्या वापरात किती वाढ झाली हे स्पष्ट होते. पोलिसांची कारवाई सुरू असली, तरी नाशिकमध्ये कट्टे येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. नाशिक जिल्ह्याला गुजरात, मध्यप्रदेशची सीमा असल्याने कट्टा तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. गुंडांच्या टोळ्या यातून वाढीस लागल्या आहेत. याच तस्करीतून संघटीत गुन्हेगारी वाढत असून, गावठी कट्ट्यांचा वापरही वाढत आहे. पोलिसांनी कारवाई करुन अटक केलेल्या आरोपींच्या चौकशी व तपासादरम्यान नाशिक जिल्ह्यात मध्यप्रदेशातील उमरठी गावातून या कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, तिथपर्यंतच हा तपास थांबत आहे.

कारवाईत येणार्‍या अडचणी

उमरठी हा गावाचा पत्ता असला, तरी शस्त्रे तयार करण्याचा कारखाना स्वरूपात जंगलात सुरू आहे. बडवानी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचित्र असून, स्थानिकांना हाताशी घेतल्याशिवाय जंगलात फिरता येत नाही. त्यात, परराज्यातील पोलीस एखाद्या अड्ड्यावर पोहचले, तर गुन्हेगारांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनाही कारवाईत अडचणी येतात.

कुठयं ठिकाणी आहे उमरठी गाव

मध्य प्रदेशातील उमरठी हे गाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यापासून दीड तासांच्या अंतरावर आहे. चोपड्यापासून जाणारे दोन वेगवेगळे रस्ते गावापासून थोडेसे दूर एकत्र येतात. विशेष म्हणजे, गावात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी एकाच रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या आणि अवघी शे-दोनशे घरे असलेल्या या गावापर्यंत जाऊन सर्वच गावठी कट्ट्यांचा तपास थांबतो. दोन राज्यांच्या सीमेवरील अनेक छोटी-मोठी गावे कट्टे बनविण्याच्या व्यवसायात सक्रिय असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दुर्गम भागातील जंगलात कट्टे, काडतुसे निर्मिती

नाशिकमध्ये पकडलेल्या बहुतांश कट्ट्यांचे कनेक्शन मध्यप्रदेश राज्यातील बडवानी जिल्ह्यातील दुर्गम भागातील उमरठी गावापर्यंत पोहचते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यापासून काही मिनिटांतच मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करता येतो. उमरठी गावाच्या आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलात कॅम्प लावून गावठी कट्टे तयार होत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. या ठिकाणाहून तस्कर चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येतात. त्यानंतर जिल्हानिहाय शस्त्र तस्करी केली जाते.

नाशिकसह इतर जिल्ह्यातही पुरवठा

उमरठी गावातून चोपडा, अमळनेर किंवा सेंधवा भागातून शहाद्यापर्यंत हे कट्टे पोहचतात. तेथून काही तस्करांच्या माध्यमातून गावठी कट्टे धुळे, जळगाव, नाशिकपर्यंत येतात. अनेकदा पोलीस अशा तस्करांना अटक करतात. मात्र, पोलिसांचा तपास उमरठी किंवा सेंधवा जिल्ह्यापर्यंत पोहचतो आणि तेथेच थांबतो. एका राज्याची आणि तीन जिल्ह्यांची सीमा ओलांडून हे कट्टे विक्रीस येतात.

अशा आहेत कट्टे, काडतुसांच्या किंमती

गावठी कट्टा : ३० हजार रुपये 
काडतुस : १ हजार रुपये नग 

शस्त्र बाळगणारे रेकॉर्डवर

दोन वर्षांपासून अवैध शस्त्र बाळगणार्‍या संशयितांचा डाटा संकलित करण्याचे काम नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरु आहे. हे गुन्हेगार आता कुठे आहेत? याची माहिती घेवून त्यांच्यावर एमपीडीए व मोक्का तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आतापर्यंत १२४ गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल २६ गावठी कट्टे जप्त केले आहेत.