पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच GBS या आजाराने पुण्यात दहशत पसरवली आहे. हा संसर्गजन्य आजार नाही, असे सांगण्यात येत असले तरी अनेकांना याची लागण झाली आहे. पुण्यातील विविध विभाग या आजाराचे केंद्र बनले आहेत. तर गुलेन बॅरीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुण्यासोबतच नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरत चाललेल्या आजाराच्या तपासासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने तज्ज्ञांची समिती पुण्यात पाठवली. पण या समितीतील अधिकाऱ्यांना पुण्यातील नांदेड गावातील लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. आज बुधवारी (ता. 29 जानेवारी) बाधित गावांची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर पाहणी न करताच परतून जात असलेल्या केंद्रीय पथकाला बाधित झालेल्या गावातील गावकऱ्यांनी घेराव घालत एकच आक्रोश केला. (GBS Outbreak in Pune Villagers surround Central Health Team)
गुलेन बॅरी सिंड्रोमची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांते सात जणांचे पथक पुण्यात आले. जिल्ह्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात GBS आजारचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे पथक नांदेड या गावात गेले. पण यावेळी गावकऱ्यांना हे पथक कोणतीही तपासणी न करता जात असल्याचे लक्षात आले. ज्यानंतर गावकऱ्यांनी गाव धोक्यात पळून जावू नका, पाहणी करा अशी मागणी केली. यावेळी मनपा पथकासमवेत मनपा कर्मचारी होते. दरम्यान, गावकऱ्यांनी घेराव घालताच केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आता काहीच माहिती नसून माहिती घेतल्यानंतर सविस्तरपणे सांगू अशी प्रतिक्रिया दिली. पण गावातील लहान मुलांचा जीव धोक्यात असून पाण्याची पाहणी करा, अशी मागणी लावून धरली. या पथकाने गावातील विहिरींमधील पाण्याची पाहणी न करताच गावातून काढता पाय घेतल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.
हेही वाचा… Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचे हृदयद्रावक फोटो
केंद्र सरकारने गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराशी संबंधित मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम पुण्यात पाठवली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, संशोधन आणि इतर विभागातील तज्ज्ञ पथके या आजारासंदर्भात काम करत आहेत. तर, या आजारावरील उपचारांचा महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. या आजारामुळे पुण्यात आणीबाणी निर्माण झाली असताना आता राज्याच्या अन्य भागातही जीबीएस रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दूषित पाण्याचे नमूने गोळा केले जात आहेत. तसेच घरोघरी रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी पाणी उकळून प्यावे आणि थंड अन्न खाणे टाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. फक्त गरम अन्न खा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणत: एका महिन्यात फक्त 2 जीबीएस रुग्णांची नोंद होते. पण अचानक ही संख्या वाढली आहे.