जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागत सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसोबतच इतर काही मागण्यांसाठी आज (ता. 17 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने ओबीसी समाजाचे लोक हे जालन्यात दाखल झाले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित हा मेळावा होणार आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी करताच सरकारमधील मंत्री असलेल्या भुजबळांनी याविरोधात आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे आजच्या या सभेला ओबीसी समाजातील किती मंत्री उपस्थित राहणार यांकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. (General Meeting of OBCs in Jalna; Minister Bhujbal, Wadettiwar will be present)
हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी ठाम असताना दुसरीकडे ओबीसींनी देखील या विरोधात एल्गार पुकारला आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीला विरोध करण्यासाठी आजची ही सभा आयोजित करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये या सभांची रुपरेषा ठरवण्यात आली. त्यामुळे आजच्या या सभेतून ओबीसीतील सर्वच जातींकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीला विरोध होऊ शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ज्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र होत गेले. पण खरी सुरुवात ही अंतरवाली सराटी गावातून झाली होती. ते गाव या अंबड येथील सभेपासून अवघ्या 20 किलोमीटरवर आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने देखील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी ही सभा आयोजित केल्याचे बोलले जात आहे. या सभेसाठी जालना पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेसाठी येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच सभेच्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून विशेष खबरदारी देखील घेण्यात येत आहे.
ही सभा एक प्रकारे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होत आहे, असे म्हणणे कारण चुकीचे ठरणार नाही. कारण या सभेला भुजबळांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याशिवाय, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नेते महादेव जानकर, विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर, शिवाजीराव चोथे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे प्रमुख नेते सभेला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. समाजाच्या हक्कासाठी मी सभेला उपस्थित राहणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.
तर ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये, बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, 7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा, बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचे वाटप करावे आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्याही या सभेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात येणार आहेत.