घरमहाराष्ट्रकाँग्रेसच्या स्नेहल जगताप करणार ठाकरे गटात प्रवेश; लिहिली भावनिक पोस्ट

काँग्रेसच्या स्नेहल जगताप करणार ठाकरे गटात प्रवेश; लिहिली भावनिक पोस्ट

Subscribe

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या महाड सरचिटणीस स्नेहल जगताप या सभेच्या निमित्ताने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे

आज (ता. 06 मे) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील बारसू गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी बारसू प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यानंतर ते आता संध्याकाळी महाड येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यांच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या महाड सरचिटणीस स्नेहल जगताप या सभेच्या निमित्ताने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. (General Secretary of Congress Snehal Jagtap to join Thackeray group)

“आबा मी शिवसेनेत प्रवेश करतेयं…”
स्नेहल जगताप यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील हे महाड विधानसभेतून काँग्रेस पक्षाचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे स्नेहल जगताप यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली. यामध्ये स्नेहल यांनी लिहिले आहे की, “महाराष्ट्रासोबत गद्दारी करणार्यांना झुकवण्यासाठी व महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर नेहमी फडकण्यासाठी आबा मी आज उध्दवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहे,आबा तुमच्या आशिर्वादा बरोबरच उध्दवसाहेबांची ही साथ आहे.आता बघू महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाच्यात ताकत आहे.”

- Advertisement -

कोण आहेत स्नेहल जगताप?
महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या स्नेहल जगताप या कन्या आहेत. कोरोना काळात माणिक जगताप यांचे निधन झाल्यानंतर स्नेहल जगताप यांच्याकडे महाडवासियांनी राजकीय नेतृत्व म्हणून पाहिले. स्नेहल यांनी महाडचे नगराध्यक्ष पद देखील भूषविले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी 14 एप्रिल या दिवशी ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांची भेट घेऊन ठाकरे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – बारसू आंदोलकांनी शासनाशी चर्चा करावी, उद्योग मंत्री उदय सामंतांचे आवाहन

“काँग्रेसने आम्हाला नेहमीच मान सन्मान दिला आहे , याबाबत आपली कोणतीही तक्रार वा नाराजी नाही. जो संघर्ष माणिक जगताप यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे करीत आहेत, तीच प्रेरणा घेत प्रवाहाच्या विरोधात जात मी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय आपण घेत आहे. महाविकास आघाडी हेच माझे घर आहे. भविष्यात सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत, असे मत स्नेहल जगताप यांनी व्यक्त केले आहे.

आमदार भरत गोगावलेंसमोर आव्हान…
महाड विधानसभा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आणि गेल्या 15 वर्षांपासून आमदार असलेले भरतशेठ गोगावले यांनी शिंदेंना साथ दिल्यानंतर या ठिकाणी ठाकरे गटासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते. पण आता स्नेहल जगताप यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला नवी उभारी मिळणार असली तरी भरत गोगावले यांच्यासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आजच्या सभेत स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गट या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -