घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रघोलप कन्या भाजप नेत्यांच्या भेटीला; कौटुंबिक नाराजीतून तनुजा भोईर भाजपच्या वाटेवर?

घोलप कन्या भाजप नेत्यांच्या भेटीला; कौटुंबिक नाराजीतून तनुजा भोईर भाजपच्या वाटेवर?

Subscribe

नाशिकरोड । श्रीधर गायधनी
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या देवळालीवर गेली ३० वर्षे एकहाती प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा भोईर यांचा भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांचे स्वागत करतांनाचा फोटो व्हायरल झाला आहे. नाशिकमधील शिवसेनेची पडझड थांबवण्यासाठी जानेवारी महिना अखेरीस खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दौरा जाहीर केला आहे. या दौ-याचे नियोजन करण्यासाठी खा. संजय राऊत नाशकात दाखल होत असतांनाच घोलप कन्येचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करुन भाजपच्या मदतीने व्हाया गुवाहटी मार्गे राज्यात सरकार स्थापन केले या काळात नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक व विद्यमान युवासेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के हे एकमेव शिंदे गटाचा झेंडा फडकवत होते. त्यानंतर खा. हेमंत गोडसे यांनी प्रवेश केल्यानंतर प्रविण तिदमे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, मामा ठाकरे, लक्ष्मी ताठे, शिवाजी भोर, माजी नगरसेविका वैशाली दाणी, जेष्ठ नगरसेवक सुर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, शाम खोले, ज्योती खोले, नितीन खर्जुल, जयश्री खर्जुल, आदींसह शिवसेनेचे पदाधिका-यांनी प्रवेश केल्याने थेट मातोश्रीवरुन संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यावर खापर फोडत त्यांना पदावरुन हटवले, आणि काही तासात चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला, यामुळे शहराचे अर्थात शिवसेनेचे राजकीय समीकरण बदलले.

- Advertisement -

देवळाली मतदार संघ व नाशिकरोड भागातून बबनराव घोलप, माजी जिल्हाप्रमुख व लोकसभा संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, यांनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील शिवसेनेची पडझड थांबवण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे येत असून देवळाली मतदार संघाचे गेल्या तीस वर्षांपासून प्रतिनिधीत्व करणारे बबनराव घोलप यांची मोठी मुलगी माजी महापौर नयना वालझाडे-घोलप व तनुजा भोईर-घोलप यांचा मनपा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत घोलप पुत्र योगेश यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. एका पाठोपाठ झालेल्या पराभवाने घोलप कुटुंबाने थोडेही खचून न जाता मतदारसंघात युवकांची नवी मजबुत फळी तयार करुन पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातून त्यांना पर्याय उभा करण्यासाठी उपनेते बबनराव घोलप, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आदींसह दौरा करणार असतांनाच घोलप कन्येचा भाजप नेत्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे.

राजकीय महत्वाकांशा नात्याला भारी?

मनपा निवडणुकीतील पराभवानंतर घोलप यांची मुलगी तनुजा गेल्या दोन अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी म्हणून संपुर्ण देवळाली मतदार संघात विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दौरे करत आहे, माजी आमदार योगेश घोलप हे कंबर कसून जनतेच्या संपर्कात असतांना मुलगा योगेश व मुलगी तनुजा दोघेही मतदार संघात जनसंपर्क ठेवून आहेत, तनुजा भोईर यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियावरील थेट विधानसभा निवडणुकीच्या पोस्ट टाकल्या जात असल्याने जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याच्या कारणावरुन कौटुंबिक नाराजीची चर्चा आहे, दरम्यान खा. संजय राऊत नाशकातील शिवसेनेची पडझड थांबवण्यासाठी येत असतांनाच शिवसेनेशी व मातोश्री बरोबर एकनिष्ठ असलेल्या वजनदार नेत्यांच्या मुलीचा भाजप नेत्यांचे स्वागत करतांनाचा फोटो व्हायरल झाल्याने घोलप कुटुंबाची मोठी पंचायत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -