मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी पालकमंत्र्यांची घोषणा झाली होती. पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू केले. या पार्श्वभूमीवर परदेशातून रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालमंत्रिपदाला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याकडे अनेकाचे लक्ष लागले आहे. यावर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. (Girish Mahajan explained the reason behind BJP insistence for Nashik guardian minister post)
नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे हे इच्छुक आहेत. त्यामुळे पाकलमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पालमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. या संदर्भात गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाची मागणी आहे. तिन्ही पक्षाचे नेते या दोन्ही पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आधी नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी माझ्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. महायुतीमधील तिन्ही नेते यासंदर्भात चर्चा करत आहेत. त्यामुळे हा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Bharat Gogawale : रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय दोन दिवसांत; कोण म्हणतंय हे…
गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीमधील तिन्ही पक्ष तोलामोलाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, आपण पालकमंत्री व्हावं. पण 2014 ते 2019 दरम्यान कुंभमेळा होता. तेव्हा मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री होतो. त्यानंतर पुन्हा सरकार आल्यानंतर दादा भुसे यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं. तेव्हाही पालकमंत्रिपदाचा विषय लांबलेला होता. मी स्वत: दादा भुसे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्यानंतर दादा भुसे यांना पालकमंत्री करण्यात आले होते. यानंतर आता दीड दोन वर्षांनी पुन्हा एकदा कुंभमेळा येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा आग्रह मी धरला होता, अशी माहिती महाजन यांनी दिली.
दोन-तीन दिवसात पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल
दरम्यान, गिरीश महाजन म्हणाले की, मागच्या वेळी मी कुंभमेळा मंत्री राहिलो आहे. त्यामुळे दीड दोन वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यात सगळं सुरळीत करायंच असेल तर मला पाकलमंत्री ठेवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कुंभमेळ्याचं मोठं आव्हान असतं. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक कुंभामेळ्यात येतील. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केला होता. या वेळेलाही तशीच परिस्थिती राहिली तर आमचं काम अधिक सोयीचं होईल. म्हणून आम्ही नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली होती. त्यानुसार निर्णय जाहीर झाला होता, मात्र नंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की, पुढील दोन ते तीन दिवसांत नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल, असे सूचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले.
हेही वाचा – Beed : आरोपींची मानसिकता समजून घेतली पाहिजे, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुखांचा संताप