खडसेंच्या मुलाची आत्महत्या की हत्या?, गिरीश महाजनांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. खडसेंनी महाजन यांच्यावर टीका करताना त्यांना मुलगा नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर देताना एक खळबळजनक वक्तव्य करत सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा प्रश्न उपस्थित करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना डीवचलं आहे.

जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खडसेंच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे भले आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नाही. पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं, याचं उत्तर एकनाथ खडसे यांनी द्यावं, असं गिरीश महाजन म्हणाले.

एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत त्याचं भान त्यांना नाही. ते आता बेभान झाले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, कधी मला चावट म्हणतात, माझ्याबद्दल वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भोसरी प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यांसारख्या अनेक त्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत, असंही गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यापूर्वी गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होतं. यावरून आज गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.


हेही वाचा : भाजपाची मंडळी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करताहेत, शिवसेनेचा हल्लाबोल