अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्यास आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय, क्रमांक ०९ चे न्यायाधीश व्ही.एस. मलकापट्टे रेड्डी यांनी सोमवारी (दि.१८) २० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने उर्वरित दोन जणांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. ही घटना नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत २७ मे २०२१ रोजी दुपारी १ ते ३.३० वाजेदरम्यान हॅपी गेस्ट हाऊस, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक येथे घडली होती. (Girl raped; young man jailed)
रुझान समीर पठाण (वय २०, रा. जुना ओठा रोड, नाशिकरोड नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र विठोबा देवरे (२४) व रोशन नरेश कोमरे (१९) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रूझान पठाणे याने १४ वर्षीय मुलीच बलात्कार केला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण यांनी केला. त्यांनी आरोपीतांविरुध्द पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, क्रमांक ९, नाशिक येथे सुरू होती. न्यायालयाने रूझान पठाण यास दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस धनश्री हासे व कोर्ट अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनकर खैरनार यांनी पाठपुरावा केला.