पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करा; अमोल मिटकरींची मागणी अन् हिंदू महासंघाचा आक्षेप

Amol Mitkari

राज्यात राजकारणात मागील काही दिवसांपासून अहमदनगरचा नामांतरणाचा मुद्दा गाजतोय. या शहराचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी जोर धरतेय. अशात आता पुणे शहाराचेही नाव बदलण्याची मागणीही पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र यास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे अशी मागणी केली आहे. याबाबत मिटकरांनी एक ट्विट केलं आहे. पुणे शहराचे नामाकरण जिजाऊ नगर व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार, असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मात्र पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध दर्शवला आहे. जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदनीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे, अशी हिंदू महासंघाची जुनीच मागणी आहे, अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पुणे शहराच्या नामांतरवरून आता नवा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.