राज्याला तातडीने स्वतंत्र गृहमंत्री द्या

महापौर संदीप जोशी हल्लाप्रकरणी मुनगंटीवार यांची मागणी

Finance Minister Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार

नागपूरचे महापौर संजीव जोशी यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्याचा विषय बुधवारी विधानसभेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव स्विकारून कामकाज बाजूला सारून याविषयी चर्चा घ्या, अशी मागणी मुनगंटीवार यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच केली. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता तातडीने गृहखात्याला स्वतंत्र मंत्री द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी याची दखल घेत शासनाने निवेदन करावे, असे निर्देश दिले.

सभागृहाची बैठक सुरू होताच सुधीर मुनगंटीवार हे उभे राहिले, आपण नियम-57 ची सूचना दिली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागपुर शहराच्या प्रथम नागरिकावर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे. हे सरकारचे अपयश आहे. महापौरांना दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद येथे वाळू माफियांनी तहसिलदारावर ट्रॅक्टर घालणार्‍यांना मोक्का लावावा, जखमी तहसिलदारांच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी केली. त्यावरही शासनाने निवेदन करावे, असे निर्देश यासंदर्भात अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

राष्ट्रावादी काँग्रेसचे सदस्य भारत भालके यांनी कार्तिकी एकादशीस संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज महाराज यांसह वारकर्‍यांना दिवेघाटात अपघाती मरण आले त्यांना जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. त्यावेळी माजी महसूलमंत्री भाजप सदस्य चंद्रकांत पाटील यांनी आपण ती मदत पक्षातर्फे जाहीर केली होती व त्यानुसार ती कुटुंबियांना दिली गेली आहे, अशी माहिती दिली. मात्र वारकर्‍यांना राज्य सरकारकडून मदत झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.