घरमहाराष्ट्रहॅट्स ऑफ डॉ. ऋतुजा... रुग्णालयातील करोनाग्रस्तांचा मानसिक आधार

हॅट्स ऑफ डॉ. ऋतुजा… रुग्णालयातील करोनाग्रस्तांचा मानसिक आधार

Subscribe

राज्यात सध्या दररोज वाढणार्‍या करोना रुग्णाच्या संख्येमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत. मुंबईमध्ये तर हा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यातच ज्यांना करोना झाला आहे ते आणि त्यांच्या परिवाराच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण आता याच करोना झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.ऋतुजा कारखानीस-मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेकडून करोना रुग्णांचा तणाव दूर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मदत करण्याबाबत अनेकांना विचारणा देखील केली. मात्र, करोना आजारामुळे अनेक जणांनी थेट रुग्णालयात जाऊन समुपदेशन करण्यास नकार दिला. मात्र, ऋतुजा यांनी मात्र तत्काळ होकार दिला आणि कामाला सुरुवात देखील केली.

भाभा रुग्णालयापासून सुरुवात

ऋतुजा यांनी शुक्रवारपासून आपल्या कामाला सुरुवात केली असून कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांचे समुपदेशन केले. यावेळी त्यांनी पालिकेने दिलेला किट परिधान करून रुग्णालयात प्रवेश केला. तसेच करोना रुग्णांच्या विभागात जाण्यापूर्वी त्यांनी रुग्णांची नावे लिहून घेतली आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रत्येक रुग्णांचे नाव घेत त्यांचा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

त्यानंतर या रुग्णांना त्यांनी काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या जेणेकरून या रुग्णांच्या मनात असलेली नकारात्मकता जाईल. तसेच जर कॅन्सरवर मात करून एखादी व्यक्ती पुन्हा जोमाने उभी राहू शकते तर मग मी का नाही? होय, मी देखील बरा होईन आणि हा जो वाईट काळ सुरू आहे त्यावर मात करेन, अशा एक ना अनेक बाबी सांगत रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, अनेक रुग्णांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार देखील असतो. मात्र, असा कोणताही विचार न करता तुम्ही तुमच्या देवाचे नाव घ्या आणि मी पूर्णपणे बरा होईन असे स्वतःच्या मनाशी ठरवा असे देखील त्यांनी यावेळी रुग्णांना सांगितले. तसेच त्यांना मनशांतीचे काही उपाय देखील त्यांनी सुचवले. यासोबत त्यांनी सर्व रुग्णांना तुम्ही स्वतःची स्वच्छता राखा, दुसर्‍याच्या बेडवर जाऊन गप्पा मारू नका, असे एक ना अनेक उपाय देखील सुचवले.

डॉक्टर, नर्स आणि नातेवाईकांचेही करणार समुपदेशन

डॉ.ऋतुजा यांनी समुपदेशनाचे तीन भाग केले असून, यामध्ये पहिल्यांदा करोना रुग्ण त्यानंतर डॉक्टर तसेच नर्स आणि रुग्णांचे नातेवाईक यांचे देखील त्या समुपदेशन करणार आहेत. आता ऋतुजा या रुग्णांचे समुपदेशन करत असून, त्यानंतर त्या डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणार आहेत. डॉक्टर आणि नर्स या सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. एकीकडे वाढणारे रुग्ण, कामाचा ताण तसेच स्वतःची आपल्या घरच्यांची काळजी यामुळे त्यांना सध्या मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे ऋतुजा त्यांचे देखील समुपदेशन करणार असल्याचे त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान, ऋतुजा यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले असून, या कामात त्यांना त्यांच्या पतीची साथ मिळत आहे. पेशाने दिग्दर्शक असलेल्या त्यांच्या पतीने त्यांना या कामात प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

माझ्या घरच्यांना काळजी होती, पण त्यांनी मला अडवले नाही. सध्या करोना रुग्णांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे थेट रुग्णालयात जाऊन मी समुपदेशन देण्याचा निर्णय घेतला. डॉ.ऋतुजा कारखानीस-मोरे, मानसोपचार तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -