‘गोदावरीचे प्रदुषण हे मोठे पाप’; छगन भुजबळांचा विधानसभेत हल्लाबोल

नाशिक : गोदावरी नदी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण अतिशय वाढले आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक हे धार्मिक ठिकाण आहे. याठिकाणी जगभरातून भाविक येतात आणि येथील जल घेऊन जातात. मात्र आज येथील पाणी अतिशय दुषित झाले आहे गोदावरी नदीचे प्रदुषण हे मोठे पाप असल्याचे सांगत गोदाप्रदुषणप्रश्नी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात हल्लाबोल केला.

त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी स्वच्छतेच्या बाबत आज आमदार हिरामण खोसकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला. या लक्षवेधी सूचनेवर ते म्हणाले की, त्र्यंबकेश्वर नदी पात्रात गेल्या काळात मोठ्या प्रमाणात काँक्रीटचे बांधकाम करण्यात येत होते. याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले. त्यानंतर हे काम काही प्रमाणात थांबले आहे. मात्र हे काम पूर्ण बंद होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नदीचे नैसर्गिक स्त्रोत पूर्णपणे बंद होत आहे. तसेच गोदावरी नदीपात्रात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात मलजल सोडण्यात येते. त्यामुळे पाणी अतिशय दुषित होत असल्याकडे लक्ष वेधले.

रामकुंडात तर जे भाविक पाय धुण्यासाठी उतरतात त्या पाण्यात तर रक्त शोषून घेणारे कीटक आढळले आहेत. भाविकांच्या पायाला या किड्यामुळे इजा देखील पोहचत आहे. याठिकाणी नियमित स्वच्छता देखील केली जात नाही. तसेच येथील एसटीपी प्लांट अतिशय जुने झाले असून तेथे पाण्याचे कुठलेही शुद्धीकरण होत नाही ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे या मलजल प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात यावेत. तसेच आयआयटी सारख्या संस्थेची मदत घेऊन येथील सत्य परिस्थितीचा अहवाल तयार करून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली.दरम्यान यावरील उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी स्वच्छतेबाबत हरित लवादाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर १ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. याठिकाणी सुमारे १.८ एमएलडी सांडपाणी तयार होते. यासाठी शासनाच्या वतीने १.९ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगरोन्थान योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. तो पर्यंत प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अ‍ॅक्शन प्लॅन तयार

गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणत होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक मनपाच्या एसटीपी प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. शासनाकडे गोदावरी स्वच्छतेबाबत अ‍ॅक्शन प्लॅन तयार असून अमृत योजनेच्या माध्यमातून डीपीआरला लवकरच मान्यता देण्यात येऊन केंद्र व राज्य यांच्या संयुक्ताने हा प्रकल्प राबविण्यात येईल. तो पर्यंत नदीपात्रात प्रक्रिया करूनच पाणी सोडण्यात येऊन प्रदूषणाला आळा घालण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.