Homeदेश-विदेशGold Silver Rate on New Year 2025 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या...

Gold Silver Rate on New Year 2025 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घट

Subscribe

नववर्षाच्या स्वागतामध्ये रमलेल्या भारतीयांसाठी पहिल्याच दिवशी सोने-चांदीने मोठी आनंदवार्ता दिली आहे. कारण वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेज आज बुधवारी, 01 जानेवारी 2025 ला सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : नववर्षाच्या स्वागतामध्ये रमलेल्या भारतीयांसाठी पहिल्याच दिवशी सोने-चांदीने मोठी आनंदवार्ता दिली आहे. कारण वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेज आज बुधवारी, 01 जानेवारी 2025 ला सोने आणि चांदीच्या दरात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 71 हजार 240 रुपये आहे. तर, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. परंतु, 2024 च्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या म्हणजेच मंगळवार, 31 डिसेंबर 2024 च्या तुलनेत हे भाव कमी झाले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. (Gold Silver Rate on New Year 2025 Reduction in the price)

डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. वर्षभराचा विचार करता सोन्याने धुमशान घातले. तर गेल्या आठवड्यात सोने 650 रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. 31 डिसेंबर रोजी सोने 440 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घसरण होणार असल्याचे संकेत मिळाले. कारण नववर्षानिमित्त जागतिक बाजारपेठेतील बऱ्याचशा संस्था या बंद असल्याकारणाने याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… Happy New Year 2025 : देवाच्या आशीर्वादानं नव्या वर्षाची सुरूवात; भाविकांची तीर्थक्षेत्रांवर तुफान गर्दी

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,162, 23 कॅरेट 75,857, 22 कॅरेट सोने 69,764 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,122 रुपये, 14 कॅरेट सोने 44,555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,017 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

महत्त्वाची बाब म्हणजे, वर्षभरात चांदीने मोठी घौडदोड केली. 80 हजारातील चांदीने एक लाखांचा टप्पा ओलांडला. तर वर्षाअखेर ग्राहकांना दिलासा दिला. गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी वधारली होती. तर 30 डिसेंबर रोजी चांदीत बदल दिसला नाही. वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90 हजार 500 रुपये इतका आहे.