गोंदिया : दुचाकीला बोलेरो या पिकअप वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर हा अपघात झाला आहे. या घटनेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. परंतु, रविवारी (ता. 26 जानेवारी) सायंकाळी घडलेल्या या अपघातात पाच महिन्यांचा चिमुकला, त्याची आई आणि एका तीन वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Gondia Accident Bolero collides with two-wheeler, five-month-old child dies along with his mother)
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगावमधील रहिवासी संदिप राजु पंधरे (वय वर्षे 25) हा आपल्या दुचाकीवरून पत्नी चितेश्वरी पंधरे (वय वर्षे 25), पाच महिन्यांचा मुलगा संचित पंधरे आणि शेजारी राहणारी तीन वर्षाची मुलगी पार्थवी सिडाम यांच्यासोबत प्रवास करत होता. संदिप हा कुटुंबासोबत दुचाकीवरून नवेगावबांध येथे जात होता. याचवेळी बाराभाटी-नवेगावबांध मार्गावर मागून भरधाव येणाऱ्या बोलेरो या पिकअप वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक ही इतकी भयावह होती की, घटनेत चितेश्वरी पंधरे, संचित पंधरे आणि तीन वर्षाची चिमुकली पार्थवी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक संदिप राजू पंधरे हा गंभीर जखमी झाला.
हेही वाचा… Dombivli : देव तारी त्याला कोण मारी, तिसऱ्या मजल्यावरून पडला तरी वाचा, नेमकं काय घडलं?
या भीषण अपघाताची माहिती मिळताच, नवेगावबांध पोलीस यांनी घटनास्थळी पोहचून मृतकांना व जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेले. या रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या संदिप पंधरे याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर घटनेची नोंद करत हा अपघात नेमका कसा घडला? याची नवेगावबांध पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे येरंडी देवलगावावर शोककळा पसरली आहे.