गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आले आहे. यावेळी बसमधून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच, या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना काळजीवाहू सरकारने 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. (Gondia Shivshahi bus accident in gondia many people died)
हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून भाजप आग्रही; मोठं कारण आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ गोंदिया भंडारा शिवशाही बसला अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, यामध्ये 10 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीदेखील याठिकाणी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. हा अपघात कसा झाला? याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नागपूरहून गोंदियाच्या दिशेने जात असताना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी आणि डव्वा गावाजवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले.
अपघाताची माहिती मिळताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. “गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.” असे ते म्हणाले.
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
“सदर घटनेत जे लोक जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Edited by Abhijeet Jadhav