अग्निपथ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय वायूदलाकडे ६ दिवसांत १ लाखांहून अधिक अर्ज

agneepath scheme
प्रातनिधिक छायाचित्र

देशातील काही राज्यांतील तरुणांकडून लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना वायूदलाने काढलेल्या उमेदवार भरतीला मात्र तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांत भारतीय वायूदलाला १ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारतीय वायूदलाने बुधवारी एक ट्विट करत अग्निपथ योजनेंतर्गत १ लाख ८३ हजार ६३४ जणांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. तसेच तुम्हालाही अग्निवीर बनायचे असेल तर https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज भरण्याचे आवाहन हवाई दलाकडून करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे.

केंद्र सरकारने १४ जून रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर बिहारसह अनेक राज्यांतील तरुणांनी या योजनेचा निषेध करत हिंसक आंदोलन केले. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यानंतर हिंसक आंदोलनात सामील तरुणांना लष्करात उमेदवारीची संधी मिळणार नाही, असे स्पष्टीकरण लष्कराने दिले होते. या योजनेनुसार १७ ते २१ वयोगटातील तरुणांना ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यदलात भरती करून घेतले जाईल. ४ वर्षांनंतर त्यातील २५ टक्के जवानांना नियमित सैन्यदलात सामावून घेतले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते.