गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका, म्हणाले पवार बारामतीला जाताना …

Gopichand Padalkar

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीला जाताना एका ठराविक रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जातात आणि म्हणतात, बारामतीचा विकास झाल, अशी टीका केली. ते पुरंदरमध्ये बोलत होते. त्यांनी राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन तोडणी तात्पुरती थांबवली आहे, असा आरोप राज्य सरकारवर केला.

यासाठी काढला मोर्चा –

पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून 220 केबीची लाइन जाते. यात राष्ट्रवादीचे काही दलाल असून ते या सर्वांना पाठीशी घालत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बागायत शेतातून या टॉवरची लाइन टाकायचे चालू आहे. याला विरोध म्हणून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत असल्याचे पडळकरांनी सांगितले.

ओबीसींच्या जागा बळकावयाच्या आहेत –

महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाचा खून करायचा होता, तो त्यांनी केला आहे. ओबीसी आयोगाला पैसे दिले नाहीत. इतके दिवस सरकार झोपा काढत होते का, असा सवाल करत सरकारमधील काही लोकांना ओबीसींच्या जागा बळकावयाच्या आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी सरकारवर केला.

शरद पवारांवर टिका –

गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात विकास झाला, असे सांगतात, असा आरोप पडळकरांनी केला. शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही. बारामतीच्या 42 गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले.