घरमहाराष्ट्रजालन्यातील धनगर आंदोलनाला का लागले हिंसक वळण?, आमदार पडळकरांनी सांगितले कारण

जालन्यातील धनगर आंदोलनाला का लागले हिंसक वळण?, आमदार पडळकरांनी सांगितले कारण

Subscribe

जालन्यातील धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र, धनगर आंदोलक हिंसक का झाले? याबाबतचे कारण विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात सभा घेण्यात येत आहेत. तर 1 डिसेंबरपासून राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे आता धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. धनगर समाजाकडून यासाठी राज्यभरात आंदोलन आणि उपोषण करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धनगर आंदोलक आंदोलन करत आहेत. याच मागणीसाठी आज (ता. 21 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. यावेळी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास धनगर आंदोलकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. ज्यानंतर या आंदोलनातील आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु, या आंदोलनाला हिंसक वळण का लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची आणि कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. परंतु, या घटनेचे खरे कारण विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Gopichand Padalkar said reason for violent turn of the Dhangar agitation in Jalna)

हेही वाचा – आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी एक समाज आक्रमक, जालन्यात आंदोलकांकडून तोडफोड

- Advertisement -

या घटनेबाबत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यभरात सगळीकडे धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना शांततेत निवेदन देत आहे. जालना इथे आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी (ता. 20 नोव्हेंबर) भेट दिली. त्यांना काल भेटून आज (ता. 21 नोव्हेंबर) निवेदन देणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार, आज धनगर बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेले. परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी आले नाहीत. तासभर वाट पाहिल्यानंतरही वारंवार आवाहन करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे संताप अनावर झाला आणि त्यातून तोडफोड झाली. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही. परंतु हे प्रशासकीय अधिकारी आहेत, या लोकांना आरक्षणाचे गांभीर्य असण्याची आवश्यकता होती. परंतु ते होताना दिसत नाही.

तसेच, राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काही करायचे नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढच्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर बळजबरी करू नका. खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देऊ नका. असे प्रकार करू नये असे आमचे जालना जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे. तर, पोलीस अधीक्षक यांच्याशी मी फोनवर बोलून चुकीची कारवाई होऊ नये असे सांगणार आहे. वेळ पडली तर मी जालन्याला जाईन. सरकारने आता यावर लवकर मार्ग काढला पाहिजे. सरकार यातून मार्ग काढेल असा आम्हाला विश्वास आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावे, असेही पडळकरांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -