पूरग्रस्त नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७७४ कोटीची मदत

government committed to provide 774 crore for farmers nine flood-hit districts

पुरामुळे बाधित झालेल्या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. काल,मंगळवारी १४ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ८६० कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून शेतकऱ्यांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. तर पूरस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यात येत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी ७५टक्के एवढा असा एकूण ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी सोलापूर, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक आणि जळगाव या नऊ जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त यांचेमार्फत हा निधी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.


हेही वाचा – सुरक्षा यंत्रणा भेदत पेट्रोलियम प्रकल्पातून पेट्रोल चोरी; पाण्याच्या बाटल्यांचा वापर