घरमहाराष्ट्रआज मंत्रिमंडळाचा विस्तार

आज मंत्रिमंडळाचा विस्तार

Subscribe

३६ मंत्र्यांचा होणार शपथविधी

महाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी मुंबईतील विधान भवनाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागते त्यांची नावे मात्र तिन्ही पक्षांनी रविवारी रात्रीपर्यंत गुलदस्त्यात ठेवले, त्यामुळे अनेकांनी आपले नाव मंत्र्यांच्या यादीत असावे, म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सहा मंत्र्यांनी २९ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळाच्या पुढील विस्ताराकडे लक्ष लागले होते. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते.

- Advertisement -

अखेर या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवार, ३० डिसेंबर रोजी होणार आहे. या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून १० कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून देखील १० कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री तर काँग्रेसकडून ८ कॅबिनेट आणि २ मंत्री असे एकूण ३६ मंत्री राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेतील, असे बोलले जात आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना उपमुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. या पदासाठी अजित पवारांकडून दावा केला जात असल्याचे देखील पुढे आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्री पद कोणाकडे जाते हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून सर्व जागा भरणार असल्याचे बोलले जात असतानाच या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले की, आमची यादी निश्चित झाली असून ती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या यादीत राष्ट्रवादीकडून अजित पवार, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, आदिती तटकरे, डॉ. किरण लहामटे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या असून पहिल्यांदाच आमदार म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेत काम केलेले आहे. तर २०१७ पासून त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांचा पराभव करुन राष्ट्रवादीचे जायंट किलर ठरलेले डॉ. किरण लहामटे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

तर काँग्रेकडून आपली अंतिम यादी निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट दिल्ली गाठली होती. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्यासह मल्लिकाअर्जुन खर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. या मंत्रिमंडळात विस्तार अनेक नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसकडून रात्री उशिरा यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून काँग्रेसकडून यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून विस्ताराची यादी अंतिम करण्यात आली असून नाराजी टाळण्यासाठी या यादीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचे कळते. शिवसेनेकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणाला ही मंत्री पदाबाबत कल्पना देण्यात आली नसून आपले नाव या अंतिम यादीत असावे यासाठी सर्वच नेते मंडळी मातोश्रीवरुन येणार्‍या आदेशाकडे लक्ष ठेवून होते. तर शिवसेनेला समर्थन देणार्‍या प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मित्र पक्ष नाराज
मंत्रिमंडळ विस्तारासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाच्या पक्षांचा गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे फार्स सुरु होता. या बैठकीत मित्र पक्षांना वगळण्यात आल्याने या पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यात प्रामुख्याने शेतकरी स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी या पक्षांचा समावेश असून यातील अनेक नेत्यांनी याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

कोण असणार संभाव्य मंत्री

शिवसेना – रवींद्र वायकर,सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर, अनिल परब, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ.

राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भरणे, किरण लहामटे.

काँग्रेस – के.सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, अमिन पटेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -