Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शालेय विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील - दीपक केसरकर

शालेय विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील – दीपक केसरकर

Subscribe

आपल्याला पुढच्या पिढीला जर बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी राज्य शासन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व अद्यावत शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

 मुंबई: आपल्याला पुढच्या पिढीला जर बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी राज्य शासन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व अद्यावत शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापकांचा मुंबई महापालिकेच्यावतीने बुधवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलत होते. (Government is striving to provide better quality education to school students Deepak Kesarkar)

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण देण्याचे हे पवित्र काम उत्तमप्रकारे सुरू आहे. यंदा पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी, शाळा तसेच शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी काढले. दादर (पूर्व) येथील लोकमान्य टिळक कॉलनी परिसरातील योगी सभागृहात सोहळा संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्यास, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी., सहायक आयुक्त (एफ उत्तर) चक्रपाणी अल्ले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, सोनाली वगळ, संजीव गाला आदींची उपस्थिती होती.

शाळा अद्यावत करणार

शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून शासन काम करत आहे. आगामी वर्षात मुंबईतील सर्व शाळा अद्ययावत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. राज्य शासन राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे १ लाख ४२ हजार कोटी रुपये खर्च करते. त्यातील सुमारे ६२ हजार कोटी रुपये केवळ शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात यावरुन या क्षेत्राचे महत्व आपण लक्षात घ्यायला हवे. शालेय शिक्षण अधिक दर्जेदार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तके, वह्या, गणवेश आणि बूट उपलब्ध करून दिले जात आहेत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांवर मानसिक ओझेही राहू नये यासाठी पेडियाट्रीक्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत मिळून धोरण बनवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. २५ हजार विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षण आणि रोजगार मिळावे यासाठी हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससोबत मिळून उपक्रम राबविला जात आहे. शालेय मुलांना व्यवसायिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील वर्षीपासून स्काऊट गाईड अनिवार्य करण्यात येईल. याशिवाय, यावर्षी राज्यात सुमारे ५० हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन आहे. जगभरातील लोक भारताकडे आशेचे केंद्र म्हणून बघत आहे म्हणून येथील विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन प्रगती साधायला हवी, अशी भावनाही दीपक केसरकर यांनी या वेळी व्यक्त केली.तर, भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, आपण १९५९-६० मध्ये महानगरपालिका शाळेत शिकलो आहे. तेव्हा शिक्षणाच्या खूप अडचणी होत्या. पण आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळा उत्तम पद्धतीने काम करत आहेत. आगामी काळात येथील विद्यार्थी राज्यातून पहिला यायला हवा, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.

पुढील वर्षी १५० पेक्षा अधिक शाळांचा निकाल हा ८५ टक्क्यांहून अधिक लागेल, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल, असा आशावाद सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेच्या एकूण २४९ माध्यमिक शाळा मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये कार्यरत आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सन २०२३ च्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवत नावलौकिक कमावला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या एकूण ५९ विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, शब्दकोश, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. १०० टक्के निकाल असलेल्या ४१ शाळा; ९५ ते ९९ टक्के निकाल असलेल्या ३२ शाळा; ९० ते ९४.९९ टक्के निकाल असलेल्या ३८ शाळा; ८५ ते ८९.९९ टक्के निकाल असलेल्या ४४ शाळांच्या मुख्याध्यापकांचाही या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रथम २५ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक आणि त्यांच्या पदवी शिक्षणापर्यंतचा खर्चही महापालिका करणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांमधून उत्तम गुणांनी सर्वप्रथम उत्तीर्ण झालेल्या २५ विद्यार्थ्यांना मुंबई महापालिकेच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सोबतच या २५ विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही बृहन्मुंबई महापालिका करेल. ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये; ९० ते ९४.९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.

(हेही वाचा: संसदेचे विशेष अधिवेशन गणेशोत्सवातच का? ठाकरे गटाच्या खासदाराचा सवाल)

- Advertisment -