Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी बारावी परिक्षेच्या मुल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार, परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय...

बारावी परिक्षेच्या मुल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार, परिक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इयत्ता १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला

Related Story

- Advertisement -

राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक परीक्षा रद्द केल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या (12th Board Exam cancelled) विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता या परीक्षाही रद्द करुन अंतर्गत मुल्यमापनाच्या अधारे निकाल लावण्याचे प्रस्तावित होते. बारावी परीक्षा रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून लवकरच बारावीच्या परीक्षांच्या मुल्यमापनाचे धोरण जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे. १२ वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे जून २०२१ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व तद्अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इ.१२ वी च्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

- Advertisement -

कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता राज्यामध्ये विविध स्तरावर निर्बंध लादण्यात आले. या परिस्थितीत इयत्ता १२ वी च्या परीक्षेचे आयोजन करण्यासाठी सदर परीक्षेत मोठ्या प्रमाणातील परीक्षार्थी उपस्थित राहणार असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची हाक्यता नाकारता येत नाही. परिक्षार्थीच्या कुटुंबातील एखादा सदस्य कोरोना बाधित असल्यास त्या परिक्षार्थीने परीक्षेस उपस्थित राहिल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या परीक्षार्थींनाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे परिक्षार्थी हे कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा प्रकारच्या परीक्षा टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इयत्ता १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.

या अनुषंगाने राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचे हित लक्षात घेता, शासनाने निर्णय घेतला आहे.

सन २०२०-२१ या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२१०६१११७२०४५४१२१ असा आहे.

- Advertisement -