घरमहाराष्ट्रसरकारी कार्यालयांसाठी नवे नियम: तीन फुटांचं अंतर, मास्क अनिवार्य

सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम: तीन फुटांचं अंतर, मास्क अनिवार्य

Subscribe

देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. मात्र या टप्प्यात हळूहळू नियम आणि अटींसह सरकारी कार्यालये आणि सर्व उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

देशभरातील लॉकडाऊनचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू नियम आणि अटींसह सरकारी कार्यालये आणि सर्व उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून राज्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार राज्य सरकारने सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम जारी केले आहेत.

- Advertisement -

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं काढलेल्या अधिकृत परिपत्रकात चार टप्प्यात या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
१) सरकारी कार्यालये सुरु करण्यापूर्वी त्यांमध्ये काय आवश्यक बदल करण्यात यावेत.
२) या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
३) एखाद्या सरकारी कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास काय करायचं याबाबतच्या सूचना
४) कार्यालयाच्या निर्जंतुकीकरण करतानाचा कुठली खबरदारी बाळगायची.

१) सर्वसाधारण सूचना 
  • कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज थर्मल स्क्रिनिंग करणे.
  • हवा खेळती राहण्यासाठी कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवणे.
  • सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी मास्क संपूर्ण कार्यालयीन वेळेत वापरणं अनिवार्य.
  • कर्मचाऱ्यांनी जंतुसंसर्ग टाळण्यासाठी नाकाला, डोळ्यांना आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.
  • सर्दी-खोकला झाल्यास किंवा शिंकताना-खोकताना स्वच्छ रुमालाचा वापर करावा, टिश्यू वापरल्यास तो तत्काळ बंद कचऱ्याच्या डब्यात टाकावा.
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान ३ फुटांचे अंतर असावं, गरज पडल्यास बैठक व्यवस्था बदलावी.
  • कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य आहे.
  • कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हँडवॉशची व्यवस्था करण्यात यावी.
  • वारंवार वापरात येणाऱ्या वस्तू जसे लिफ्टचे बटन, बेल, टेबल-खुर्च्या आणि कार्यालयातील इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा २ टक्के सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनने स्वच्छ पुसून घेणे.
  • सर्व संगणक, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घेणे, ७० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने याचं निर्जंतुकीकरण करावे.
  • कार्यालये नियमितपणे धुवून घ्यावीत, त्यासाठी सफाई कामगारांनी ग्लोव्ह्ज, रबर बूट, ट्रिपल लेअरचा मास्क वापरावा, वापरानांतर या वस्तूंची बायोमेडिकल वेस्टच्या नियमांनुसार विल्हेवाट लावावी.
  • या सर्व मार्गदर्शक सूचना दर्शनिय ठिकाणी लावाव्यात.
२) कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
  • एकाच वाहनातून अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवास करु नये.
  • ई-ऑफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्यात.
  • बाहेरील कमीत कमी लोकांना कार्यालयात प्रवेश द्यावा, या सर्वांची थर्मल स्क्रिनिंग करावी.
  • कार्यालयीन बैठका प्रत्यक्ष बैठक खोलीत न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात. कर्मचाऱ्यांनी कर्यालयात एकत्र बसणे, एकत्र डबा खाणे तसेच एकाच ठिकाणी जमा होणे टाळावे, त्यासाठी आदेश काढावेत.
  • एकच काम अनेक व्यक्तींना करणे आवश्यक असल्यास २-३ लोकांचा गट करणे, कारण जंतुसंसर्ग झाल्यास फक्त त्याच गटाचे अलगिकरण होईल.
३) अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यास
  • कोणत्याही कर्मचाऱ्याला १००.४ डिग्री फॅरेनहाईटपेक्षा जास्त ताप असेल, खोकला, दम लागत असेल तर तत्काळ रुग्णालयात भरती करावे.
  • कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास १४ दिवस त्याला कार्यालयात येऊ देऊ नये.
  • कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास हायरिस्क आणि लोरिस्क कॉन्टॅक्टची यादी तयार करावी.
  • पॉझिटिव्ह कर्चमाऱ्याशी तीन फुटांपेक्षा कमी अंतरावर १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ जर कोणाचा त्याच्याशी संपर्क आला असल्यास त्या कर्चमाऱ्याचे हायरिस्क कॉन्टॅक्ट असे वर्गीकरण करावे.
  • हायरिस्क कर्मचाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे.
  • लोरिस्कच्या कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर केला असेल तर त्यांना कार्यालयात प्रवेश द्यावा अन्यथा घरीच क्वारंटाइन करावे आणि घरुन काम करण्याच्या सूचना द्याव्यात.
  • जर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे कामाचे ठिकाण पाहून तो मजला किंवा इमारत निर्जंतुक करावी आणि कामकाज पुन्हा सुरु करावे.
४) निर्जंतुकीकरण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना 
  • फरशी पुसताना तीन बादल्यांचा वापर करावा. एका बादतील पाणी आणि डिटर्जंट, दुसऱ्या बादलीत स्वच्छ पाणी आणि तिसऱ्या बादलीत निर्जंतुकीकरणासाठी १ टक्का सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावण असावे.
  • फरशी प्रथम डिटर्जंटच्या पाण्याने स्वच्छ धुवावी.
  • पुसलेले कापड दुसऱ्या बादलीमधील पाण्याने स्वच्छ करावे, त्यानंतर हे कापड तिसऱ्या बादलीतील द्रावणात बुडवून पुन्हा फरशी पुसून घ्यावी.
  • फरशी पुसताना एकाच दिशेने आतून बाहेरील बाजू पुसण्यात यावी.
  • दरवाजा, खिडक्या, लिफ्ट १ टक्का सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने पुसून घ्यावी.
  • संगणक, प्रिंटर, कि-बोर्ड, माऊस, स्कॅनर इ. इलेक्ट्रॉनिक वस्तू ७० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने पुसावेत.
  • कार्यालयीन स्वच्छतागृहे दिवसातून तीन वेळा १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा डिटर्जंटचा वापर करुन स्वच्छ ठेवावीत.
  • जर कार्यालयात एकाचवेळी ५ किंवा त्यापेक्षा जास्त कaरोनाचे रुग्ण आढळले तर हायड्रोजन पॅरॉक्साईड (H2O2) चा वापर करुन रुग्ण सापडलेल्या भागात फॉगिंग करावं, त्यानंतर २४ तासांनंतर इमारतीचा वापर सुरु करावा.

हेही वाचा – उद्यापासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना सुरु होणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -