मंदिरात असलेलं सोनं ताब्यात घ्या, अर्थव्यवस्था वाचवा – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन आपला मुद्दा सांगितला आहे. “वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे”, असे ट्विटमध्ये चव्हाण यांनी सांगितले आहे. देशाची अर्थव्यवस्था पुरवदावर आणण्यासाठी २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे मी आधीच सांगितले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी पॅकेजवर पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे. “लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी GDPच्या किमान १० टक्के (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा.”

दि. १२ मे रोजी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. तब्बल २० लाख कोटींचे पॅकेज त्यांनी जाहीर केले, या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.