हुश्श्य, केसांचं जंजाळ कमी होणार; सलून उघडण्यास लवकरच परवानगी!

saloon

संपूर्ण राज्यातल्या नाभिक समाजाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. कारण राज्यातील केशकर्तनालय आणि पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे अशी माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीतीलमध्ये एका पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात चर्चाही झाली आहे, असेही ते म्हणाले.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात अनेक व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण सलून आणि पार्लर सुरु करण्यास परवानगी न दिल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलून सुरु करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. अखेर नाभिक समाजाच्या मागण्यांची सरकारने दखल घेतली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असून येत्या आठवड्याभरात याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, सलून सुरु झाल्यावर सामाजिक अंतर आणि इतर अटींचे पालन करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अनलॉकच्या या टप्प्यात आता मंगल कार्यालयात ५० व-हाडी व पाच वाजंत्री यांच्या उपस्थितीत लग्न लावता येईल. मात्र मंगल कार्यालयातील वातानुकुलीत यंत्रणा बंद ठेवावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतर जिल्हा वाहतूक

केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रेड झोन वगळून उर्वरीत भागात आंतर जिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेच पाहिजे अशी सरकारची भूमिका असून लवकरच आयुक्त स्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.