घरमहाराष्ट्रशिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील - विनोद तावडे

शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील – विनोद तावडे

Subscribe

शिक्षकांकडून शिक्षणबाह्य कामे कमी करावीत, अशी मागणी संबंध राज्यातून होत आहे. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही मागणी पुर्ण करु असे आश्वासन दिले.

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, त्यांच्याकडील शिक्षणबाह्य काम कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली असून आता इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीही या शाळांमध्ये येत असून डिजीटल शाळा, शिक्षणवारी या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र राज्यात दिसत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांबरोबर चर्चा करताना सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या शिक्षकांच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यापूर्वी शिक्षकांशी चर्चा करत असताना ही माहिती दिली.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे पुढे म्हणाले की, शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे. त्यांच्याकडे असलेले अतिरिक्त काम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शाळेला सोयी-सुविधा मिळविण्यासाठी जनतेतून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करावा, शासनाकडूनही निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्व शाळा डिजीटल करण्यावर शासनाचा भर दिला आहे. या डिजीटल शाळेमुळे वीज देयक जास्त येत आहे. शाळांमध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प कसा राबविता येईल, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच आदिवासी भागातील शाळांवर शासनाचे विशेष लक्ष आहे. तेथील शाळा अत्याधुनिक करण्यावर भर दिला जाणार आहे. शिक्षणाची वारी हा उपक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे. या उपक्रमामुळे शाळांमध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. शिक्षकांचे काही प्रश्न असल्यास ते [email protected] या माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. आठ दिवसांच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे आश्वासानही त्यांनी शेवटी दिले.

- Advertisement -

पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सिने अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

मायमहानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये आज याच विषयावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत सहभागी झालेले शिक्षक साहेबराव महाजन आणि अनिल बोरनारे यांनीसुद्धा शाळाबाह्य कामे कमी केल्यास गुणवत्ता वाढेल हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सातारा येथे याच मुद्द्याला हात घालून शिक्षकांची मागणी रास्त असल्याचेच एकप्रकारे सिद्ध केले आहे.

वाचा – FB Live: अपुऱ्या सुविधांमुळे मराठी शाळांचा टक्का घसरला – शिक्षकांची खंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -