मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खुलासा

Bhagat-Singh-Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मुंबईबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात माफीदेखील मागितली आहे. दरम्यान, माध्यमांशी न बोलण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्याचा खुलासा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

महाराष्ट्र सदनात त्यांच्या हस्ते हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांनी बोलणे टाळणे, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच त्यांनी पाठ फिरवली. राज्यपालांनी काढता पाय घेत असताना कोश्यारी यांनी प्रसारमाध्यमांशी दोन-चार मोघम वाक्य बोलली. माध्यमांचा आग्रह पाहता मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, अशी दोनचार मोघम वाक्य त्यांनी बोलली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून भाजपश्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे दिसत आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोश्यारींनी माफी मागितली होती. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतूकपणे काही चूक झाली असेल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास कोणी मनाई करू शकते का? या प्रश्नावरून आता वाद निर्माण होऊ शकतो.


हेही वाचा : स्वत:चा फोटो मोठा आणि आम्हाला एकाच फोटोत बसवलं, अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी