घरताज्या घडामोडीराज्यपालांना परतीचे वेध; गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींच्या पाठवणीची शक्यता

राज्यपालांना परतीचे वेध; गुजरात निवडणुकीनंतर कोश्यारींच्या पाठवणीची शक्यता

Subscribe

मुंबई : आधी महाविकास आघाडी सरकार असताना घेतलेली आडमुठी भूमिका तसेच विविध वादग्रस्त विधानांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. पण आता त्यांना परतीचे वेध लागले आहेत. त्यांनी विविध प्रसंगी खासगीत तसेच जाहीर कार्यक्रमात तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता गुजरात निवडणुकीनंतर त्यांची उत्तराखंडात पाठवणी होईल, अशी शक्यता आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार वादग्रस्त विधाने केली आहेत. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तशी ओळख राहणार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात त्यांनी माफीदेखील मागितली. शिवाय, माध्यमांशी न बोलण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनीच सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देखील राज्यपालांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. तर, आता छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या काळाबद्दल बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

त्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि राज्यपाल कोश्यारी हटाव अशी एकमुखी मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना माघारी जायचे असून त्यांनी खासगीत अनेकदा सांगितल्याचे म्हटले आहे. मी त्यांना उपमुख्यमंत्री होतो तेव्हा देखील भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है. मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा. त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

- Advertisement -

राज्यपालांनी पुन्हा एकदा अशी इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांना निवृत्ती हवी असल्याचे म्हटले होते. मला निवृत्त व्हायचे आहे, पण मी राज्यपालपदावर कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावर सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले होते. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेच्या वतीने युवा प्रेरणा शिबिरात बोलत असताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. आता लवकरच त्यांची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून 8 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांची पाठवणी होण्याची शक्यता आहे.

याचदरम्यान, राज्यपालांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावर आता राजभवनकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून हे सर्व वृत्त तथ्यहीन असल्याचं सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : आता गोवरग्रस्त रुग्णांनाही केलं जाणार क्वारंटाईन; टास्क फोर्सचे आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -