राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सकाळी ११ वाजता त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

ज्यापद्धतीने राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यापद्धतीने महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आपल्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवणार आहेत.

हेही वाचा : देशातच नव्हे तर परदेशातही एकनाथ शिंदेंचीच चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर

एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ते स्वतंत्र गट स्थापन करण्याची शक्यता होती. शिंदे राज्यपालांकडे पाठिंब्याचं पत्र देणार होते. परंतु भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पाठिंब्याचं पत्र हे राज्यापालांना कसं देणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर गोव्याच्या राज्यपालांना पत्र देणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु राज्यपाल कार्यालयाने कोणाकडेही चार्ज दिला जाणार नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची आज तात्काळ महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात ही बैठक पार पडणार आहे. तर खासदार संजय राऊत हे सुद्धा सकाळी ११.३० वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत.


हेही वाचा : उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, जिल्हाप्रमुखांच्या बोलावल्या बैठका