घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राचे राज्यपाल स्वातंत्र्यदिनी पुण्यात ध्वजारोहण का करतात ? कारण काय, जाणून घ्या

महाराष्ट्राचे राज्यपाल स्वातंत्र्यदिनी पुण्यात ध्वजारोहण का करतात ? कारण काय, जाणून घ्या

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पुण्यातील कौन्सिल हॉल येथे ध्वजारोहण केले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख तसेच नागरिकांचाही समावेश होता. पण पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची ही पहिली वेळ नाही. दरवर्षी ध्वजारोहणासाठी राज्यपालांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनाचा समारोह पुण्यात होत असतो. तर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मात्र राज्यपालांचे ध्वजवंदन हे मुंबईत होत असते. पण पुण्यात १५ ऑगस्टला महाराष्ट्राचे राज्यपालांकडून ध्वजारोहण करण्याचा एक मोठा इतिहास आहे. तर पुण्यातल्या राज्यपालांच्या निवासस्थानाचा असा जवळपास १८० हून अधिक वर्षे जुना असा इतिहास आहे.

raj-bhawan pune

- Advertisement -

गव्हरमेंट हाऊस

पुण्यातील गणेशखिंड म्हणजे सध्या अनेकांना चटकन आठवते ते म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापिठ किंवा पुणे विद्यापीठ.स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशखिंड म्हणजे मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे पुण्यातील पावसाळी निवासस्थान म्हणजे गव्हरमेंट हाऊस हीच ओळख होती. पुण्यातल्या साथीच्या प्लेगच्या रोगाच्या कालावधीत नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या वाल्टर चार्लस् रॅंड यांचेही कनेक्शन या गव्हरमेंट हाऊसशी आहे. रॅंड या अधिकाऱ्याचा मुक्काम याच निवासस्थानी होता. इंग्लंडच्या राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ता आयोजित सभारंभाहून परततेवेळी रात्री चाफेकर बंधूंनी रॅंड या अधिकाऱ्याचा खून केला.

राज्यपालांचे निवासस्थानाचे वेळापत्रक

मुंबईत ऑक्टोबर ते एप्रिल, मे महिन्यात महाबळेश्वर आणि जून ते सप्टेंबर असे चार महिने पुण्यात असा राज्यपालांच्या निवासस्थानाचा कालावधी हा ब्रिटिशकाळापासूनच निश्चित झालेला आहे. या कालावधीत वर्षानुवर्षे बदल झालेला नाही. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यपालांचे पावसाळी निवासस्थान म्हणजे पुण्यातील ‘गव्हरमेंट हाऊस’ हे असते.

- Advertisement -

Rajbhavan Pune

 

पुण्याला का होते महत्व ?

 

पुण्याचे भौगोलिक स्थान, राजकीय उपयुक्तता आणि हवामान असा तिहेरी फायदा ब्रिटीशांनीच ओळखला होता. मुंबई प्रांताच्या राज्यपालांचे गव्हरमेंट हाऊसच्या आधीच पुण्यातील निवासस्थान म्हणजे दापोडी. त्यामुळेच दापोडीची शासकीय निवासस्थान म्हणून सर्वात पहिली ओळख आहे. ब्रिटीशांची दख्खन मराठा प्रदेशासाठीची राजकीय कुटनीती आणि रणनीती ही याच निवासस्थानी ठरली. पण दापोडीच्या निवासस्थानाच्या आता कोणत्याही खुणा उरलेल्या नाहीत. भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वात्र्यानंतर असे महाराष्ट्राचे राज्यपालांचे पावसाळी निवासस्थान म्हणून पुण्यातील निवासस्थानाच्या मुक्कामाला १८० वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. राज्यपालांच्या आतापर्यंतच्या इतिहासात जून ते सप्टेंबर पुण्यात त्यानंतर मे महिन्यात महाबळेश्वर आणि मुंबई असा तिन्ही ठिकाणी मुक्काम ठेवणारे राज्यपाल म्हणून (१९५६-६२) असा उल्लेख श्रीप्रकाश यांच्या नावेच नोंदविण्यात आला आहे.

raj bhawan mahabaleshwar

राज्यपालांचा पावसाळ्यात मुक्काम का ?

ब्रिटिशकाळात पुणे ही पश्चिम भारताची दुसरी राजधानी होती. तसेच पुण्याला लष्कर तसेच अनेक सरकारी विभागांचे मुख्यालय झाले होते. यासाठीचा अभिप्राय हा मॅक्लिन यांनी १८७५ मध्ये लिहून ठेवला आहे. पुणे येथे भारतातील गव्हर्नर लोकांच्या शाही निवासस्थानांपैकी एक असे सर्वोत्तम निवासस्थान आहे. तसेच पश्चिम भारताची संसद बसू शकेल इतके प्रशस्त सभागृह आहे. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी वर्षातून तीन ते चार वेळाच डझनभर विधायक बसतात. १८७१ साली पुण्यात बांधून पुर्ण झालेल्या निवासासाठी योग्य असल्याचेही मॅक्लिन यांनी अभिप्रायात नोंदवले आहे. पण पुण्यात गव्हर्नर हाऊस बांधण्यामागे राजकीय उपयुक्तता हा एलफिस्टन यांचा हेतू होता. पुण्याच्या निवासस्थानाचा फायदा म्हणजे एलफिस्टन यांच्या मताने पुण्याचे हवामान हे इंग्लंडच्या हवामानाप्रमाणे आल्हाददायक होते. तसेच राजकीय उपयुक्तता हादेखील त्यामागचा एक हेतू होता. तर महाबळेश्वर येथे बांधण्यात आलेले निवासस्थान हे केवळ ब्रिटिशांना मे महिन्यात मुंबईतल्या उष्ण आणि दमट हवामानापासून आराम मिळावा इतकाच त्याचा उद्देश होता.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -