घरमहाराष्ट्र'डॉक्टर- रुग्णांमधील संवाद मानवतावादी व्हावा'

‘डॉक्टर- रुग्णांमधील संवाद मानवतावादी व्हावा’

Subscribe

रुग्णांसाठी दयेने काम केल्यास डॉक्टर आणि रूग्णांतील नाते दृढ होईल. याबाबतीत वैद्यकीय शिक्षण देणं गरजेचं असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितलं.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील वाढणारे तणावाचे प्रसंग ही बाब चिंतनीय असून दोघांमधील होणारा संवाद अधिक मानवतावादी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रूग्णांसाठी दयेने काम केल्यास त्यांच्यातील नाते दृढ होईल. वैद्यकीय शिक्षण देताना याबाबतही शिक्षण देणं गरजेचं असल्याचे सुतोवाच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथ्या विशेष पदवी प्रदान समारंभादरम्यान ते बोलत होते.

याविषयी अधिक माहिती देताना राज्यपाल म्हणाले, “परदेशी वैद्यकीय प्रवेश सहज असल्याने भारतीय हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी चीन, रशिया, युक्रेन आदी देशांमध्ये जातात. जर आपल्याकडील वैद्यकीय प्रवेशही सुलभ केल्यास भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थीही आपल्याकडे आकर्षित होतील”, असा दावा राज्यपालांनी केला. दरम्यान, कुपोषणमुक्ती, आरोग्य अशा विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना विद्यापीठाने डि. लिट ही मानद पदवी प्रदान केली.

- Advertisement -

गडचिरोली जिल्ह्यात गरीब आणि आदिवासी बांधवांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं काम डॉ. बंग दाम्पत्याने केलं आहे. गेले चार दशकांपासून आदिवासी भागात राहून बंग दांपत्य काम करत असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल यांनी व्यक्त केली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दाम्पत्याचं कौतुक केलं.

२०११ च्या जनगणनेनुसार, देशात ६० वर्षांवरील १०४ दशलक्ष ज्येष्ठ नागरीकांची लोकसंख्या २०५० पर्यंत देशात ३४० दशलक्ष इतक्यावर जाणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यावर विचार करुन ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याविषयी धोरण ठरवणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -