राज्यपालांच्या वक्तव्याने भाजपा अडचणीत; मुनगंटीवार, दरेकरांकडून सारवासारव

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे भाजपा अडचणीत आला आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर यांनी मात्र सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारींनी केले आहे.

पण त्यांच्या या विधानाबद्दल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना, राज्यपालांनी ‘कालबाह्य’ हा शब्द वापरलेला नाही, याकडे लक्ष वेधले. बोलताना आपण प्रतिकात्मक उल्लेख करत असतो, पण त्याचा अर्थ अवमान करणे असा होत नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिशिवाजी म्हटले जायचे. मग त्याचा अर्थ काय घेणार? ते प्रतिशिवाजी होते का? त्याचप्रमाणे शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणतात. तर, दोन भावांना राम आणि लक्ष्मणाची जोडी म्हणतो, अशी उदाहरणे देऊन मुनगंटीवार यांनी सारवासारव केली.

तर, राज्यपालांचा उद्देश छत्रपतींचा अपमान करण्याचा असेल असे वाटत नाही, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. शिंदे-फडणवीस सरकारचे काम उत्तम पद्धतीने चालेल असल्याने विरोधकांना टीका करायला संधीच मिळत नाही. शिवाजी महाराजांच्या वंशजाकडो पुरावे मागणारे हे लोक आज महाराजांचा पुळका आल्यासारखे बोलत आहेत. आपल्याला या मुद्यावरून काही साध्य करता येईल का, हे ते पहात आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगत दरेकर यांनी महाविकास आघाडीवर खापर फोडले आहे.

निलेश राणेंची टीका
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मात्र राज्यपालांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे, आमची श्रद्धा आहे. महाराजांची कोणाशीही तुलना करणे महाराष्ट्राला सहन होणार नाही, असे निलेश राणे यांनी राज्यपालांना सुनावले.