घरमहाराष्ट्रमुंबई-ठाण्याच्या रस्त्यांवर गोविंदा पथकांचा जल्लोष; उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांवर गोविंदा पथकांचा जल्लोष; उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

Subscribe

गंभीर जखमी झालेल्यांना 7050 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे (LockDown Due to Corona) दोन वर्षे कोणतेच सण उत्सव साजरे झाले नाहीत. तरुणांचा हक्काची असलेली दहीहंडीसुद्धा स्तिमित करण्यात आली होती. दरम्यान, यावर्षी कोरोनाचा संसर्ग अटोक्यात असल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे दहीकाला उत्सवात साजरा केला जातोय. आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्याच्या रस्त्यांवर गोविंदा पथके सज्ज झाली असून मानाची हंडी, सलामी देण्याकरता गोविंदा पथके बाहेर पडली आहेत.


मुंबईच्या रस्त्यांवर तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. माझगाव, दादर, घाटकोपर, ठाणे येथे गोविंदा पथकांनी गर्दी केली आहे. दादरच्या आयडीअल समोरील दहीहंडीला सलामी देण्यात आली असून राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवही उत्साहात सुरू झाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अनेक ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला असून प्रो-गोविंदा स्पर्धाही राज्यस्तरावर भरवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी गोविंदा पथक आतूर झाले आहेत. मुख्यमंत्री खालीलप्रमाणे उपस्थित राहणार आहेत.

  • दुपारी १२.०० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- टेंभी नाका, ठाणे
  • दुपारी १.०० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- घाटकोपर, मुंबई
  • दुपारी २.०० वा. -दहिहंडी उत्सव
    स्थळ:- मागाठाणे, बोरिवली
  • दुपारी २.३० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ:- मीरा भाईंदर,जि. ठाणे
  • दुपारी ३.३० वा. -दहिहंडी उत्सव
    स्थळ :- भिवंडी, जि. ठाणे
  • सायंकाळी ५.०० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- खेवरा सर्कल, हिरानंदानी मिडोझ, जि. ठाणे
  • सायंकाळी ५.३० वा.- प्रो गोविंदा दहिहंडी उत्सव
    स्थळ :- वर्तकनगर, ठाणे
  • सायंकाळी ६.०० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- किसन नगर शाखा, ठाणे
  • सायंकाळी ६.३० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- रघुनाथ नगर,
  • सायंकाळी ७.०० वा.- दहिहंडी उत्सव
    स्थळ :- अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे
  • रात्रौ ८.०० वा.
    दहिहंडी उत्सव
    स्थळ:- टेंभी नाका, ठाणे

हेही वाचा – दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाण्यातील काही महत्वाच्या हंड्या

* टेंभीनाका : दिघे साहेबांची मानाची हंडी मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी अडीच लाखांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह तर महिला गोविंदा पथकासाठी एक लाखांचे पारितोषिक ठेवले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी बारा हजार, सहा थरांसाठी आठ हजार, पाच थरांसाठी सहा हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

* वर्तकनगर: संस्कृति युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन या महोत्सवात विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला २१ लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच एकूण लाखो रूपयांच्या बक्षिसांचेही वाटप केले जाणार आहे.

* जांभळी नाका: आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या महोत्सवात मुंबईतील पथकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये, ठाण्यातील गोविंदा पथकाला आनंद दिघे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये आणि महिला पथकाला मिनाताई ठाकरे यांच्या नावाने ५१ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.

* डॉ काशिनाथ घाणेकर चौक: स्वामी प्रतिष्ठान या महोत्सवात ५१ लाखांची दहीहंडी असणार आहे. तसेच स्वातंत्र्याचे ७५ वर्षपूर्ती निमित्ताने ७५ हजार महिलांची कॅन्सर निदान तपासणी केली जाणार आहे.

बाळकूम: साई जलाराम प्रतिष्ठान या महोत्सवात ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख दोन लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिके असणार आहेत. तसेच बाळकूम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गावकरी गोविंदा पथकास रोख २५ हजार व आकर्षक चषक, महिला गोविंदा पथकास रोख रूपये २१ हजार आकर्षक चषक, तसेच ६ थर ७ थर व ८ थर अशी सलामीसाठी रोख रक्कम दिले जाणार आहे.

*नौपाडा,भगवती मैदान : मनसे विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेची ‘स्पेन’ वारी तसेच एकुण ५५ लाखांची बक्षिसे लावली आहेत. नऊ थरांसाठी ११ लाखांचे सामुहिक पारितोषिक असणार आहे.

राज्यात दहीहंडीच्या स्पर्धा

पुढील वर्षापासून राज्यात दहीहंडीच्या स्पर्धा भरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. प्रो गोविंदाप्रमाणे गोंविंदा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.

राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा

इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो. तसेच, काही गोविंदा जखमी होतात अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक

बुधावरी राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती. आज या संबंधीत जीआर काढत या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

7050 लाख रुपयांची मदत देण्यात येणार

दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7050 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -