घरमहाराष्ट्रबक्षिसाचे लोणी चाखायला गोविंदा निघाले शहराबाहेर

बक्षिसाचे लोणी चाखायला गोविंदा निघाले शहराबाहेर

Subscribe

५ थरांच्या सलामीसाठी मुंबई-ठाण्याबाहेर जास्त दर

मुंबई-ठाणे दहीहंडी उत्सवाचे माहेरघर मानले जाते. सरकार तसेच न्यायालयाकडून मानवी मनोर्‍यांच्या उंचीवर निर्बंध येण्याआधी दोन्ही शहरांतील दहीहंडी उत्सव आयोजकांकडून गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात केली जायची, मात्र मागील २ वर्षांत कोरोना संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकला नाही. तसेच आयोजकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

यंदा राज्य सरकारने सणोत्सवांवरील सर्व निर्बंध हटवल्याने गोविंदा पथकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. मुंबई-ठाणे परिसरात पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र यंदा दहीहंडी फोडल्यानंतर मिळणारे बक्षिसरूपी लोणी काहीशा प्रमाणात आटल्याने गोविंदा पथकांनी आपला मोर्चा शहराबाहेरील दहीहंड्यांकडे वळवला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबई, ठाण्यातील अनेक गोविंदा पथके पुणे, दापोली, महाड, कर्जत आदी शहरांतील बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी कूच करणार आहेत.

- Advertisement -

मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ५ थरांच्या सलामीचा दर मुंबई आणि ठाण्यामध्ये ३ ते ५ हजारांच्या घरात आहे, परंतु शहरांबाहेर हाच दर ५ ते ८ हजारांच्या घरात आहे. सहाव्या आणि सातव्या थरापर्यंतच्या सलामीसाठी गोविंदा पथकांना मुंबई, ठाण्यात ८ ते १५ हजार रुपये मिळतात, परंतु शहरांबाहेर हाच दर १५ ते २२ हजारांच्या घरात आहे. परिणामी यंदाच्या वर्षी मुंबई आणि ठाण्यातील अनेक गोविंदा पथकांचा ओढा हा महाड, दापोली, कर्जत, पुणे आदी शहरांमध्ये जाण्याचा आहे. मुंबई-ठाण्यामधील काही बड्या आयोजकांचा अपवाद वगळता सलामीसाठी लावण्यात येणार्‍या थरानुसारचा दर काहीसा कमी असल्यानेच यंदाच्या वर्षी शहरांबाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंदा पथकांचे म्हणणे आहे.

वर्षानुवर्षे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी या ठिकाणी जाऊन आमच्या पथकाकडून दहीहंडी फोडण्यात येते, परंतु गेली २ वर्षे कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले नाही. यंदाच्या वर्षी मुंबई, ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून अतिशय कमी बक्षीस मिळत आहे. त्यामुळेच आम्ही यंदा मुंबई, ठाण्यापेक्षा पुण्यासह इतर शहरांमध्ये जाण्यास प्राधान्य दिले आहे.
– महेश तांबट, अध्यक्ष, श्री साई गोविंदा पथक, काळाचौकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -